Join us

हुल्लडबाज गोविंदांवर कारवाई; ७८ गोविंदा जखमी, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:37 AM

मुंबईसह उपनगरात नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे पाहिले गेले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ट्रिपल सीटपासून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना शेकडो गोविंदा शुक्रवारी रस्त्यावर पाहिले गेले.  परिणामी, वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. या सर्वांवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. राजतिलक रोशन यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. 

मुंबईसह उपनगरात नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे पाहिले गेले. याबाबत मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर शेकडो तक्रारीचा पाऊस पडला होता.  रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, बऱ्याच ठिकाणी चायनीज हॉर्नचा वापर करणे, विना हेल्मेट गाडी चालविणे, ट्रीपल सीटसह मोठमोठ्याने लाउडस्पीकर वाजवत ध्वनी प्रदूषण करण्याचा प्रकार घडला.

राज्यासह मुंबईत तब्बल दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव जोश आणि जल्लोषात साजरा झाला. त्यात मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.  दहीहंडी उत्सवादरम्यान हंडी फोडताना थरांवरून कोसळून शहर उपनगरात आतापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी ६७ जणांवर उपचार झाले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

सकारात्मक बाब म्हणजे यंदाच्या उत्सवात शून्य मृत्यूची नोंद आहे. शहर उपनगरात जे. जेमध्ये ३, सेंट जाॅर्ज रुग्णालयात ३, जीटी ११, नायर ९, केईएम १७, सायन ७, जोेगेश्वरी ट्रामा २, कूपर ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय १, व्ही.एन. देसाई रुग्णालय ६, राजावाडी १०, पोद्दार रुग्णालय ४ गोविंदांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी दिले होते. गोविंदांचा १० लाखांचा विमाही काढण्यात आला आहे.

एकूण जखमी गोविंदा ७८उपचार करून घरी सोडण्यात आलेले ६७उपचाराधीन गोविंदा ११

टॅग्स :दहीहंडीमुंबई