मुंबई : राज्यातील मोटार वाहन विभागमधील (आरटीओ) तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाºयांनी शुक्रवारी लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यातील ५० आरटीओमध्ये विविध कामगारांसाठी जाणाºया वाहन चालक व मालकांच्या कामांचा खोळंबा होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे एक दिवसीय आंदोलन असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिली.सरतापे म्हणाले की, आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या लेखणी बंद आंदोलनात परिवहन आयुक्त कार्यालयासह राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी सहभागी होणार आहेत. आपल्या मागण्यांबाबत अनेक वेळा सरकारकडे निवेदने दिली होती. मात्र कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. सुमारे दीड हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सरतापे यांनी सांगितले.संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की, सर्व कर्मचारी एक दिवस दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकून आपला रोष व्यक्त करतील. मुळात ३ जानेवारीला राज्य स्तरीय ठिय्या आंदोलनातून कर्मचाºयांनी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावेळी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने, संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे नवीन वाहन परवाना, परवाना नुतनीकरण, विमा अशी विविध कामे खोळंबतील. यानंतरही सरकारने कर्मचाºयांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, तर संघटनेच्या पुढील कार्यकारिणी बैठकीत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. या आंदोलनामुळे लोकांच्या वाहन परवान्याचे काम एक दिवस रखडणार आहे.
आरटीओच्या कामांना आज ब्रेक लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:24 AM