मुंबईत टी२० क्रिकेटचा ‘रुद्र’ अवतार
By admin | Published: May 12, 2017 12:58 AM2017-05-12T00:58:47+5:302017-05-12T06:18:31+5:30
युवा फलंदाज रुद्र धांडे याने मुंबई क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद करताना टी-२० क्रिकेटमध्ये केवळ ६७ चेंडूंत नाबाद द्विशतक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युवा फलंदाज रुद्र धांडे याने मुंबई क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद करताना टी-२० क्रिकेटमध्ये केवळ ६७ चेंडूंत नाबाद द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. माटुंगा जिमखाना येथे सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठ अबिस रिझवी चॅम्पियन्स ट्रॉफी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत रुद्रने ‘रुद्रावतार’ दाखवताना आपला झंझावात सादर केला.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत रिझवी महाविद्यालयाकडून सलामीला खेळणाऱ्या रुद्रने मालाडच्या प्रल्हादराय दालमिया महाविद्यालयाविरुद्ध हा विक्रम रचला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या रिझवीने रुद्रच्या या वादळी खेळीच्या जोरावर २० षटकांत केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात ३२२ धावांचे एव्हरेस्ट उभारले.
रुद्रने समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला मजबूत चोपताना ३९ चेंडूंत शतक साजरे केले. यानंतर त्याने आणखी रुद्रावतार धारण करताना दालमिया संघाच्या गोलंदाजांना पार बेजार केले.
रुद्रने आपल्या खेळीदरम्यान २१ चौकार आणि तब्बल १५ उत्तुंग षटकार ठोकून नाबाद २०० धावांसह द्विशतक केले. दरम्यान, या भल्यामोठ्या धावसंख्येपुढे आणि रुद्रच्या जबरदस्त धुलाईनंतर आधीच मानसिक खच्चीकरण झालेल्या दालमिया संघ जेव्हा फलंदाजीला उतरला, तेव्हा त्यांचा डाव १०.२ षटकांत अवघ्या ७५ धावांमध्ये गडगडला. यासह रिझवी संघाने तब्बल २४७ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. (वृत्तसंस्था)