लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाला ‘विश्वविद्यालय अनुदान आयोगा’ (यूजीसी)कडून स्वायत्ततेचा दर्जा नुकताच बहाल करण्यात आला आहे. स्वायत्तता बहाल करण्यात आलेले २०१७ मधील रुईया हे मुंबईतील पहिले महाविद्यालय आहे. पाच वर्षांसाठी रुईयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून रुईया महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रक्रिया सुरू होती. यूजीसीने या आठवड्यात प्रक्रिया पूर्ण झाल्याचे घोषित करून रुईयाला पत्र पाठविले. त्यामुळे पुढील पाच वर्षांत रुईयामध्ये अनेक शैक्षणिक बदल करून, शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा मानस असल्याचे रुईयाचे प्राचार्य सुहास पेडणेकर यांनी सांगितले. प्राचार्य पेडणेकर यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षीपासूनच रुईयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल झाला आहे. त्यामुळे आता शैक्षणिकदृष्ट्या बदल करण्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडण्याची आवश्यकता आहे. त्याच दृष्टीने आम्ही बदल करणार आहोत. शिक्षण क्षेत्रातील बदल तीन स्तरांवर करण्यात येणार आहेत. पहिला बदल हा अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. जगाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, असे अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना चांगले अभ्यासक्रम शिकून विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढावीत, म्हणून सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स सुरू केले जाणार असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.
रुईया महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा बहाल
By admin | Published: July 02, 2017 6:47 AM