लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खरेतर त्यांनी आयुष्यभरासाठी सोबत राहण्याच्या आणाभाका खात संसाराच्या वेलीवर रेशीमगाठी बांधल्या होत्या. किरकोळ वाद आणि गैरसमजामुळे परस्पराचे मार्ग स्वतंत्र आखण्याचे निश्चित केले होते. समजुतीचे दोन बोल सुनावल्यानंतर आपली चूक उमगली आणि झाले गेलेले विसरून पुन्हा आनंदाने एकत्रित सहजीवन जगण्यासाठी ते सज्ज झाले.
वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात शनिवारी अशा प्रकारे ८ जोडप्यांचे मनोमिलन घडून आले. त्यासाठी निमित्त ठरले ते लोकअदालतीचे.
फॅमिली कोर्टाचे प्रभारी प्रमुख न्यायाधीश पी. एल. पालसिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली ही अदालत झाली. किरकोळ वादविवादामुळे घटस्फोटापर्यंत टोकाचे पाऊल उचललेल्या जोडप्यांचे सामोपचाराने वाद मिटविले. त्यांनी तक्रारी मागे घेत पुन्हा एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला, तर ४४ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण ४१९ खटले दाखल होते. त्यामध्ये उपरोक्त ५४ प्रकरणे निकालात निघाली.
या लोकअदालतीमध्ये फॅमिली कोर्टातील न्यायाधीश, रिटायर न्यायाधीश, वकील, अधिकारी व अन्य कर्मचारी सहभागी होते. या कार्यक्रमाचे संयोजन मॅनेजर मठपती व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.