तलाव क्षेत्रात मुसळधाऱ़़
By admin | Published: July 12, 2016 02:56 AM2016-07-12T02:56:14+5:302016-07-12T02:56:14+5:30
गेला वीकेण्ड चिंब करणाऱ्या पावसाने यावेळीसही तलाव क्षेत्रात रविवारचा मुहूर्त गाठला़ अन् अवघ्या २४ तासांमध्ये ३६ दिवसांचा जलसाठा तलाव क्षेत्रांमध्ये वाढला आहे़
मुंबई : गेला वीकेण्ड चिंब करणाऱ्या पावसाने यावेळीसही तलाव क्षेत्रात रविवारचा मुहूर्त गाठला़ अन् अवघ्या २४ तासांमध्ये ३६ दिवसांचा जलसाठा तलाव क्षेत्रांमध्ये वाढला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत या तारखेला जलसाठ्यात दोन लाख दशलक्ष लीटर्सने वाढ झाली आहे़ म्हणजेच एकूण गरजेच्या ३५ टक्के पाणी तलावांमध्ये जमा झाले आहे़ त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी ही कपात प्रशासनाने मागे घेण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत़
गेल्या वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे़ त्यातच जूनचा संपूर्ण महिना कोरडा गेल्यामुळे यावर्षीही पाणीबाणीची शक्यता व्यक्त होत होती़ मात्र जुलै महिन्यात तलाव क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे़ विशेष म्हणजे प्रत्येक वीकेण्डला पर्यटकांप्रमाणे पाऊसही तलाव क्षेत्रामध्ये हजेरी लावू लागला आहे़ रविवारी सकाळी ६ पर्यंत मिळालेल्या तलावांमधील पाण्याची स्थितीनुसार ५० ते ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला होता़ तर आज सकाळी मिळालेल्या तलावांच्या पातळीनुसार गेल्या २४ तासांत तलाव क्षेत्रांमध्ये तब्बल एक लाख ३७ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ आज दिवसभरही पावसाची हजेरी मुसळधार असल्याने जलसाठा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)१पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने करुन दाखविल्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरु आहे़ मात्र खडड्यात गेलेले रस्ते, रस्ते व नालेसफाईचा घोटाळ अशा सर्व नकारात्मक गोष्टींमुळे शिवसेनेच्या रिपोर्टकार्डवर लाल शेरेच जास्त लागलेले आहेत़ पाणीकपात हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
२निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी पाणीकपात रद्द करण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहेत़ त्यामुळे जलसाठ्यात आज चांगली वाढ दिसून येताच, येत्या स्थायी समितीच्या बैठकीत ही कपात मागे घेण्यासाठी प्रशासनावर शिवसेनेकडून दबाव टाकण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते़