मेट्रो-३ मार्गिकेवर जूनपासून पडणार रूळ; आत्तापर्यंत ६० टक्के काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:50 AM2020-03-11T00:50:04+5:302020-03-11T00:50:19+5:30
मेट्रो- मार्गिकेचे आत्तापर्यंत ८० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या संपूर्ण मार्गिकेवर ८५ टक्के खोदकाम करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) मेट्रो-३ मार्गिकेचे काम करण्यात येत असून या मार्गिकेचे आत्तापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर येत्या जूनपासून रूळ टाकण्याचेही सुरू काम करण्यात येणार असून हे काम लार्सन अॅन्ड टुब्रो लिमिटेड (एल अॅन्ड टी) या कंपनीला दिले आहे.
एमएमआरसीतर्फे कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो- ३ मार्गिकेचे ५५ किलोमीटर लांबीचे भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरे ते बीकेसी दरम्यानची सेवा सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. एल अॅन्ड टी सोबत यासंदर्भात करारही करण्यात आला आहे. या करारानुसार कंपनीला डिझाईन, रूळांचे काम, खरेदी, परिक्षण अशी कामे करावी लागणार असून ४० किलोमीटरवर रूलही टाकण्याचे काम करण्यात येणार आहे.
८० टक्के भुयारीकरण पूर्ण
मेट्रो- मार्गिकेचे आत्तापर्यंत ८० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या संपूर्ण मार्गिकेवर ८५ टक्के खोदकाम करण्यात आले आहे. या मार्गिकेच्या कामासह इतर कामेही करण्यात येत आहेत. एमएमआरसीने मेट्रो मार्गिकेतील स्थानकांचे आत्तापर्यंत ७१ टक्के काम पूर्ण केले आहे. यामध्ये मरोळनाका स्थानकाचे ६७ टक्के, विधानभवन स्थानकाचे ६५ टक्के आणि सीप्झ स्थानकाचे ५८ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
३२ पैकी २५ ब्रेकथ्रू पूर्ण
मेट्रो-३ मार्गिकेचे काम एकूण सतरा टीबीएमच्या साहाय्याने करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३२ ब्रेकथ्रूपैकी २५ ब्रेकथ्रू पूर्ण करण्यात आले आहेत. आता फक्त सात ब्रेक थ्रू शिल्लक आहेत. मार्गिकेवर जमिनीपासून २२ मीटर खाली ही मार्गिका तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. या उर्वरित ब्रेकथ्रूचे कामही आता वेगाने करण्यात येत आहे. संपूर्ण मार्गिकेसाठी सतरा टनेल बोरिंग मशीनचा (टीबीएम) वापर करण्यात येत आहे. संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत.