मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिताना जगभरातील सर्व देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. त्यांनी देशातील राज्य आणि केंद्राला विविध अधिकार बहाल केले होते. त्यांनी लिहिलेली राज्यघटना सर्वोत्तम आहे.देशात माजत असलेली दुफळी आणि असंतोषाचे वातावरण ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा देशात सन्मान व आदर केला पाहिजे. सध्या देशात राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. ती देशासाठी घातक आहे, अशी परखड टीका खासदार आणि जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अंधेरीत केली
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, अंधेरी, चार बंगला येथे ७४ वा संविधान दिवस सोहळ्यात बोलत होते.या प्रसंगी डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, वडाळाचे प्राचार्य प्रा.डॉ. यशोधरा वराळे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनावणे हे होते.
कुमार केतकर पुढे म्हणाले की,१९३५ ते १९५० या १५ वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी देशात विविध चळवळी, जागतिक घटना व अनेक उलथापालथी बघितल्या. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मपणे वेध घेऊन आपली राज्यघटना लिहिली. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाने घटना समितीतील विविध विचारसरणीच्या सभासदांना एकत्र करन आणि त्यांच्यात समन्वय साधून सर्वोत्तम घटना साकारली. त्त्यामुळे त्यांचे चरित्र हे केवळ त्यांचे व्यक्तिचरित्र नव्हे तर तो एक इतिहास आहे. तो इतिहास नसता तर आज आपली राज्यघटना तयार झाली नसती. म्हणूनच राज्यघटना समितीचे अध्यक्ष होणं हे सर्वार्थाने न्याय्य ठरलं असून त्यांनी अध्यक्षपदाला योग्य न्याय दिला आहे.
स्वातंत्र, समता बंधुता आणि सामाजिक न्याय ही भारतीय संविधानाची मूल्ये आहेत. त्यामुळे एकात्मता टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण सर्व भारतीयांनी त्यामुळे देशात संविधानात सांगितलेली उद्दिष्टे पाळणे हे आपले कर्तव्य आहे. लोकभावना आणि राज्यकर्त्यांचा उद्देश एकत्र जपला नाही तर या देशाचं सुद्धा विघटन होऊ शकतं. आज देशात जी अराजकता आहे ती थांबवली गेली पाहिजे असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी प्रा. डॉ. यशोधरा वराळे म्हणाल्या की, "समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय यामुळेच आपल्या देशाची राज्यघटना ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. या देशातील प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे जगण्याचा, प्रगती करण्याचा व धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या देशातील प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे. हे त्यांनी राज्यघटनेच्या कलमांचा संदर्भ देऊन त्याचे सविस्तर विश्लेषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भगवान गौतम बुद्धांचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे राज्यघटनेमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे धम्माच्या शिकवणीचा पानोपानी उल्लेख केला आहे. त्यांनी अन्य देशांच्या घटनेचा सखोल अभ्यास केल्यामुळे आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. राज्यघटनेचा जर योग्य वापर झाला नाही तर वरिष्ठ न्यायालयात अन्यायाची दाद मागता येते असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.
नितीन सोनावणे यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी संस्थेचा परिचय करून देताना समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वकिलांची कार्यशाळा, पत्रकारितेचे प्रशिक्षण वर्ग, विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग व उद्योजगता कार्यशाळा इ. उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे चिटणीस रत्नाकर रिपोटे, चिटणीस, सदाशिव गांगुर्डे, कोषाध्यक्ष, नीना हरिनामे, सुनिल वाघ व संजय जाधव इ. विश्वस्त उपस्थित होते. कार्यक्रमाला अनेक मान्यवर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.