मुंबईच्या विकास आराखड्यातील रस्ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:34+5:302021-03-08T04:06:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात जे रस्ते नमूद करण्यात आले आहेत, प्रत्यक्षात ते रस्ते अस्तित्वातच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात जे रस्ते नमूद करण्यात आले आहेत, प्रत्यक्षात ते रस्ते अस्तित्वातच नाहीत; अशा रस्त्यांच्या निर्मितीसाठी राजकीय पक्ष आणि राज्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. येत्या काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या जाहीरनाम्यात राजकीय पक्षांनी, राज्यकर्त्यांनी याचा उल्लेख करावा. या रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. असे झाले तरच मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल, असा आशावाद रविवारी रोड मार्चच्या वतीने सकाळी साडेसहा वाजता आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
मुंबई शहर आणि उपनगरांतील नद्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी काम केलेल्या ‘रिव्हर मार्च’ या लोकचळवळीने आता रोड मार्च ही चळवळ हाती घेतली आहे. रोड मार्च चळवळीअंतर्गत ‘लापता सडक’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, त्यानुसार मुंबईचे जे तीन विकास आराखडे आहेत, त्या विकास आराखड्यांतील रस्ते बनविण्यात यावेत. या प्रमुख मुद्द्यावर भर देण्यात येणार असल्याचे चळवळीचे कार्यकर्ते गोपाळ झवेरी यांनी सांगितले. १९६७, १९९१ आणि २०१४ या सालांत मुंबईचे विकास आराखडे सादर झाले. या तिन्ही विकास आराखड्यांमध्ये जे जे रस्ते दाखविण्यात आले; ते रस्ते आजही पूर्ण झाले नाहीत. हे रस्ते जर पूर्ण झाले तर मुंबईची वाहतूक व्यवस्था बळकट होईल. त्यामुळे विकास आराखडा प्रत्यक्षात उतरविणे यावर भर दिला जात आहे. ‘लापता सडक’ या उपक्रमांतर्गत जे रस्ते विकास आराखड्यात आहेत; पण प्रत्यक्षात नाहीत अशा रस्त्यांना शोध घेण्याचे काम केले जाणार आहे.