Join us

मुंबई विमानतळावर उतरणाऱ्यांसाठी नियम लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 2:25 AM

देशांतर्गत प्रवाशांसाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार दिल्ली, राजस्थान, गोवा, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांतून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईविमानतळ प्रशासन सतर्क झाले आहे. बाहेरील राज्यांतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी गुरुवारपासून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

देशांतर्गत प्रवाशांसाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार दिल्ली, राजस्थान, गोवा, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांतून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. हा आरटी-पीसीआर अहवाल ७२ तासांसाठी वैध मानला जाईल. उपरोल्लेखीत राज्यांमधून आलेल्या प्रवाशांकडे तसा अहवाल नसल्यास मुंबई विमानतळावर त्यांची चाचणी केली जाईल. त्याचा सर्व खर्च प्रवाशांकडून वसूल केला जाईल, असे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.

सध्या मुंबई विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणीसाठी ६०० रुपये आकारले जातात. त्याचा अहवाल ८ ते २२ तासांपर्यंत देण्यात येतो. जलद अहवाल हवा असल्यास ४ हजार ५०० रुपये मोजावे लागतात. हा अहवाल १३ मिनिटांत दिला जातो.

गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची भीतीबाहेरील राज्यांतून आलेल्या प्रवाशांची चाचणी केल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर किंवा इच्छित स्थळी जाण्याची परवानगी दिली जाते. परंतु, अहवाल मिळण्याआधीच अशा प्रवाशांना मोकाट सोडल्याने मुंबईत कोरोना प्रसार होण्याची भीती विमानतळावरील सूत्रांनी व्यक्त केली. तर इतक्या लोकांना अहवाल येईपर्यंत विमानतळावर बसवून ठेवल्यास गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडेल, असे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्याविमान