आता घर सजवता येणार मनासारखे, विकास नियोजन आराखड्यात नियम बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:26 AM2018-09-02T03:26:48+5:302018-09-02T03:26:57+5:30
नव्या बांधकामांमध्ये प्रत्येक फ्लॅटमधील खोल्यांच्या आकाराबाबत असलेले नियम विद्यमान विकास नियोजन आराखड्यात बदलण्यात आले आहेत.
मुंबई : नव्या बांधकामांमध्ये प्रत्येक फ्लॅटमधील खोल्यांच्या आकाराबाबत असलेले नियम विद्यमान विकास नियोजन आराखड्यात बदलण्यात आले आहेत. त्यामुळे घरमालकाला आपल्या आवडीनुसार बदल करून घर सजविता येणार आहे. पाइपलाइन व इमारतीला धक्का बसेल, असे कोणतेही बदल टाळून आपल्या मनासारखे घर मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत विकासकाच्या रचनेप्रमाणे घर विकत घेणे ग्राहकांसाठी अपरिहार्य होते. घर खरेदी केल्यानंतरही विकास नियंत्रण नियमावलीतील बंधनामुळे ग्राहकाला घरात बदल करताना मर्यादा येत होत्या. मात्र, असे कोणतेही नियम नव्या आराखड्यात स्पष्ट करण्यात न आल्याने ग्राहकांना नवीन घर आपल्या पसंतीप्रमाणे घेता येईल.
हे बदल करताना विकास नियंत्रण नियमावलीचा भंग करता येणार नाही. इमारतीचे खांब, मूळ ढाच्या व जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनीच्या मार्गात बदल करता येणार नाहीत. इमारत सुरक्षित ठेवणे व गळतीच्या तक्रारी येणार नाहीत, यासाठी हे नियम करण्यात आले असल्याचे, पालिकेच्या विकास नियोजन खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पालिका अधिकाºयांची कसोटी
इमारतीचा आराखडा विचारपूर्वक नियोजन करून तयार करण्यात आलेला असतो. त्यात असे बदल केल्यास भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे पालिका अधिकाºयांना आता डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
घरामध्ये अंतर्गत बदल करतानाही अनेक बंधने असल्याने बºयाच वेळा रहिवाशांवर सोसायटी व महापालिकेकडूनही कारवाई होत असे. मात्र, नव्या आराखड्यातील सुधारणेमुळे नियमात राहून काम केल्यास, मुंबईकरांना कारवाईची भीती बाळगण्याची गरज नाही.
यापूर्वी फ्लॅटमध्ये स्वयंपाकगृह दाखविणे बंधनकारक होते. आता स्वयंपाकगृहाऐवजी नुसता ओटा दाखविला, तरी चालण्यासारखे आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहासाठी मोठी जागा न वापरता बैठकीची खोली ग्राहकांना मनासारखी वाढविता येणार आहे.