मुंबईच्या बाजारात मास्कचे नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:12 PM2020-12-24T18:12:59+5:302020-12-24T18:13:18+5:30
Corona News : मार्शल म्हणतात नागरिक ऐकत नाहीत.
साध्या वेशातल्या क्लीन अप मार्शलकडून अरेरावी
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मास्क लावून घराबाहेर पडणे मुंबई महापालिकेने बंधनकारक केले असून, विनामास्क फिरणा-या नागरिकांना दंड ठोठाविण्यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी क्लीन अप मार्शल तैनात केले आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लघन करणा-या नागरिकांना क्लीन अप मार्शलकडून दंड ठोठविला जात असला तरी अनेक घटनांत नागरिक आणि क्लीन अप मार्शलमध्ये शाब्दिक संघर्ष होत आहेत. काही प्रकरणे तर थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहचली असून, क्लीन अप मार्शल अरेरावी करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दुसरीकडे नागरिकच ऐकत असल्याचे म्हणणे क्लीन अप मार्शलने मांडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेने सातत्याने आवाहन करूनदेखील अनेक नागरिकांचा मास्क नाका तोंडावर नाही तर हनुवटीवर असल्याचे चित्र आहे.
नाताळ आणि मार्गशीष महिन्याच्या निमित्ताने बुधवारसह गुरुवारी मुंबईच्या बाजारपेठांत किंचित गर्दी दिसून आली. दादर, प्रभादेवी, कुर्ल्यासारख्या मोठया बाजारापेठांमध्ये गर्दी नेहमीप्रमाणेच ओसांडून वाहत असतानाच तत्पूर्वी झवेरी बाजार, भायखळा मार्केट, कुर्ला येथील मार्केटसह उर्वरित सार्वजनिक ठिकाणी क्लीन अप मार्शलकडून मोठया प्रमाणावर कारवाई सुरु आहे. विनामास्क वावरणा-या नागरिकांकडून दंड आकारण्यासह थुंकणा-या नागरिकांनाही मार्शलकडून दंड आकारला जात आहे. मात्र अशा अनेक प्रकरणांत नागरिक आणि मार्शल यांच्यामध्ये वाद होत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, क्लीन मार्शल बहुतांश ठिकाणी गणवेशावर नसतात. शिवाय त्यांच्या गळ्यात ओळखपत्रदेखील नसते. काही ठिकाणी मार्शल लपून कारवाई करतात. क्लीन अप मार्शलच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत. झवेरी बाजार येथील मार्शलच्या म्हणण्यानुसार, विनामास्क आढळणा-या नागरिकांवर आम्ही कारवाई करतो. पण बाजारात अनेकदा अडचणी येतात. भायखळा येथील मार्शलच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना कितीही सांगा मात्र ते ऐकत नाहीत. लोकांना पकडले तरी अक्षरश: ते पळ काढतात. अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. दरम्यान अनेकवेळा मार्शल गणवेशावर नसल्याने वादात आणखी भर पडते. बुधवारी कुर्ला येथे कारवाई करणारे मार्शल साध्या वेशात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘लोकमत’ कडे केल्या होत्या. तर दुसरीकडे बहुतांशी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी नाका तोंडावर मास्क लावण्याऐवजी हनुवटीवर लावल्याचे चित्र असते.
-------------------
- महापालिकेने संस्थांच्या माध्यमातून २४ प्रभागात मार्शल नेमले आहेत.
- आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.
- दंड आकारणा-या मार्शला टार्गेट देण्यात आले आहे. हे टार्गेट पुर्ण करण्यासाठी मार्शलची तारेवरची कसरत होत आहे.
- करारानुसार दंडाद्वारे प्राप्त झालेल्या रक्कमेतील ५० टक्के रक्कम पालिकेला मार्शलची नेमणूक करणा-या संस्थांना द्यावी लागत आहे.
- पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे.
- रेल्वे स्थानकांबाहेर, बस थांबा, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणे मार्शलचा खडा पहारा आहे.