हॉटेलांमध्ये अन्नपदार्थ सुरक्षेच्या नियमांचे वाजले तीनतेरा; दीड वर्षांत १२ लाख रुपयांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 01:02 PM2022-08-07T13:02:14+5:302022-08-07T13:02:45+5:30
तपासणी मोहिमेच्या माध्यमातून दीड वर्षांत १ हजार ७९७ ठिकाणांहून अन्नाचे नमुने घेतले आहेत.
मुंबई : अन्न सुरक्षेचे नियम मोडणारे फेरीवाले, लहान-मोठे व्यावसायिक आणि हाॅटेलांमध्ये एफडीएने कारवाईचा बडगा उचलला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या दीड वर्षांत शहर, उपनगरांतील अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करत १२ लाख ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात फेरीवाले, लहानमोठे खाद्यविक्रेते आणि हॉटेल्स या आस्थापनांवर मिळून एकूण २४० खटले दाखल केले आहेत, त्यातील १११ गुन्हे निकाली काढले आहेत. या कारवाईत ९७ आस्थापनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २१ खटले प्रलंबित आहेत.
या तपासणी मोहिमेच्या माध्यमातून दीड वर्षांत १ हजार ७९७ ठिकाणांहून अन्नाचे नमुने घेतले आहेत. त्यातील १ हजार ६२ नमुने प्रमाणित आढळले असून १०३ नमुने कमी दर्जाचे असलेले आढळले आहेत. या मोहिमेत उत्पादनांवरील जाहिरात दाखवून दिशाभूल करणाऱ्या ३८ आस्थापनांवर कारवाई केली आहे. तर १२ आस्थापनांमध्ये हानिकारक अन्न आढळले आहेत. तपासणी मोहिमेतील ७७३ अहवाल प्रलंबित आहेत.
अन्नपदार्थांचा योग्य दर्जा नसल्याचे आढळून आल्यास पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. कमी दर्जाचे अन्नपदार्थांचे उत्पादन केल्यास पाच लाख दंड होऊ शकतो. आरोग्यास हानिकारक पदार्थ बाळगल्यास ६ महिने कारावास एक लाखाचा दंड ते अन्नपदार्थ सेवनाने मृत्यू झाल्यास सात वर्षे कारावास ते जन्मठेप होऊ शकतो. - शशिकांत केकरे, बृहन्मुंबई सहआयुक्त (अन्न)
एक कोटींचा साठा जप्त
गेल्या दीड वर्षांत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १ कोटी ६७ लाख ७० हजार ४५८ रुपयांचा साठा जप्त झाला आहे. शहर उपनगरांत ७३ ठिकाणी कारवाई केली आहे. मुंबईत ४९ गुन्हे दाखल आहेत.
परवान्यासाठी ४०० अर्ज प्रलंबित
दीड वर्षांत परवाना मिळण्यासाठी १४ हजार ३१२ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १३ हजार ८०८ परवाने मंजूर करण्यात आले आहेत. अजूनही एफडीएकडे ४०० अर्ज परवान्यासाठी प्रलंबित आहेत.