शिक्षण मंडळ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा २९ एप्रिल, तर बारावीची २३ एप्रिलपासून सुरू हाेईल. काेराेना संसर्गाचा धाेका पुन्हा वाढू लागल्याने ऑफलाइन हाेणाऱ्या या परीक्षांच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी काेणत्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, यासंदर्भातील नियमावली येत्या दाेन दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होईल. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिलदरम्यान होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत देण्यात येतील. त्याचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.
परीक्षेसंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणेच अधिकृत निवेदने मंडळाचे संकेतस्थळ तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत लेखी सूचना शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी त्याच सूचना अधिकृत मानाव्यात, समाज माध्यमांनी दिलेल्या माहितीवर, अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.
................................