मुंबई : महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील सांगण्यास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिला, तर ही भेट राज्य सरकारकडून प्रसारमाध्यमांची होत असलेली गळचेपी यासंदर्भात होती, असे भाजप नेत्यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. ही नियुक्ती तातडीने करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळांना पुन्हा एकदा राज्यपालांकडे केली आहे. यावर अद्याप राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या संदर्भातच राजकीय भेटीचा सिलसिला सुरू असल्याचे समजते.महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते मंत्री एकनाथ श्ंिदे, परिवहन मंत्री अनिल परब, आणि मंत्री अस्लम शेख यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. या मंत्र्यांसमवेत राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता हे देखील होते. राजभवनावरील या भेटीनंतर आघाडीच्या मंत्र्यांची सह्याद्री विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनिती ठरविण्यात आल्याचे समजते.आघाडीचे नेते राज्यपालांना भेटल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री विनोद तावडे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही राज्यपालांची भेट घेतली. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना बारा तास पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी बसवून ठेवण्यात आले. काही पत्रकारांना अटक करण्यात आली. यासंदर्भात आम्ही राज्यपालांना निवेदन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सत्ताधारी, भाजप नेते राज्यपालांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:35 AM