Join us

आरक्षणाचे श्रेय फडणवीस, शिंदेंना देत सत्तापक्षाने विरोधकांना घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 9:22 AM

विधानसभेत रणकंदन : मराठा, बहुजन आमदारांकडून पहिल्यांदाच आक्रमक शाब्दिक हल्ले

मुंबई :  सत्तापक्षातील मराठा आणि बहुजन समाजाच्या आमदारांनी राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सर्व श्रेय हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या आमच्या नेत्यांना असल्याचे सांगत बुधवारी विधानसभेत विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ले केले. सोबतच विरोधकांचे मराठा समाजावरील प्रेम बेगडी असून, ते वेळीच ओळखा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांना सत्तापक्षाच्या आमदारांनी केले. 

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारावरून काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेनेला घेरण्याची संधी सत्तापक्षाच्या आक्रमक आमदारांनी साधली. सत्तापक्ष फ्रंटफूटवर आणि विरोधी पक्ष बॅकफूटवर असे बुधवारचे विधानसभेतील चित्र होते. या कवायतीमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाचे एकही आमदार बोलले नाहीत.  

‘जशास तसे’ची रणनीती

मराठा आरक्षणाचा फटका महायुतीला बसावा, यासाठीची पद्धतशीर पेरणी विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केली गेली, त्या ‘फेक नरेटिव्ह’चा फटका बसला, असा निष्कर्ष लोकसभेतील पराभवानंतर काढण्यात आला होता.

त्यानंतर सावध झालेल्या महायुतीने आता आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट संकेत विधानसभेतील बुधवारच्या त्यांच्या आक्रमक पवित्र्याने दिले. 

वडेट्टीवार यांच्यावर निशाणा

राधाकृष्ण विखे-पाटील, शंभुराज देसाई यांच्यासारखे मराठा समाजाचे मंत्री, बहुजन चेहरा असलेले डॉ. संजय कुटे तसेच बबनराव लोणीकर, आशिष शेलार, अमित साटम, भरत गोगावले, राम कदम, नितेश राणे या मराठा नेत्यांनी आरक्षणावरून शिंदे-फडणवीसांची बाजू भक्कमपणे मांडली आणि विरोधकांची कोंडी केली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सत्तापक्षाने विशेष निशाणा साधला. एरवी कधी मराठा समाजाबरोबर असल्याचे, तर कधी ओबीसी समाजाबरोबर असल्याचे तुम्ही दाखवता आणि काल एकूणच आरक्षणाच्या मुद्यावर महत्त्वाची चर्चा असताना तुम्ही गायब का झाले, असा तिखट सवाल सत्तारूढ बाकाकडून केला गेला. बैठकीला दांडी मारल्याबद्दल विरोधकांनी मराठा, बहुजन समाजाची माफी मागितली पाहिजे, असा आग्रहही सत्तापक्षाने धरला. 

मराठवाड्यातील ‘ते’ आमदार कोण? 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात मराठवाड्यातील या सभागृहातील एक आमदार जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचे काम करीत होते. तसे मेसेज ते पाठवत होते, ‘ते’ आमदार कोण आहेत? याची चौकशी झाली पाहिजे, असे भाजपचे अमित साटम म्हणाले.

निशाणा शरद पवारांवर? 

चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले नेते मराठा समाजाच्या एकाही मोर्चात दिसले नाहीत, आरक्षणाबाबत त्यांनी कधीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, या शब्दांत महसूलमंत्री विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

राज्यातील ज्येष्ठ नेत्याने मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे आधीपासूनच म्हटले, त्यांची मुलगीही तेच म्हणते, असा हल्लाबोल भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.  

टॅग्स :विधानसभामराठा आरक्षणदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे