सत्ताधारी जोशात विरोधक कोमात

By admin | Published: May 20, 2015 10:40 PM2015-05-20T22:40:52+5:302015-05-20T22:40:52+5:30

महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच विरोधक उमेदवारच मिळत नसल्याने ‘कोमात’ तर सत्ताधारी आघाडीकडे उमेदवारीसाठी गर्दी उसळल्याने ती जोशात असे चित्र आहे.

The ruling zodiac opponent comat | सत्ताधारी जोशात विरोधक कोमात

सत्ताधारी जोशात विरोधक कोमात

Next

दिपक मोहिते ल्ल वसई
महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच विरोधक उमेदवारच मिळत नसल्याने ‘कोमात’ तर सत्ताधारी आघाडीकडे उमेदवारीसाठी गर्दी उसळल्याने ती जोशात असे चित्र आहे. उमेदवार निवडीसाठी अन्य राजकीय पक्ष धडपडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी वसई विरारमध्ये येऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले. मागील अनेक वर्षांपासून सहयोगी म्हणून एकमेकांना साथ देणारे काँग्रेस, बहुजन विकास आघाडी या निवडणुकीमध्ये एकमेकांपासून दुरावले आहेत. तसे चव्हाण यांनी काल स्पष्ट केले. त्यामुळे कार्यकर्ते उत्साही आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पक्षश्रेष्ठींनी माघार घ्यायला लावली होती. हे शल्य कार्यकर्त्यांना अखेरपर्यंत बोचत होते. पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भडीमाराला तोंड देताना चव्हाणांच्या नाकीनऊ आले. अनेक वर्षांची मैत्री असताना त्यांनी आघाडी करणार नसल्याचे जाहीर केल्याने कार्यकर्ते सुखावले परंतु उपप्रदेशातील काँग्रेसकडे स्वबळावर लढण्याइतपत उमेदवार नाहीत.
बहुजन विकास आघाडीच्या बरोबरीने सेनेनेही तयारी चालवली आहे. भाजपाशी युती होणार, अशी भाकीते व्यक्त होत असली तरी, शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेना-भाजपाने एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते. नालासोपारा येथे भाजपाच्या राजन नाईक यांनी लक्षवेधी मते घेत सेनेच्या शिरीष चव्हाण यांना तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये सेना दुसऱ्या क्रमांकावर असायची. मिळालेली मते लक्षात घेता भाजपा, सेनेकडे अधिक जागा मागेल, पण त्या जागा देण्यास सेना तयार होणार नाही.
वसईत भाजपाने विधानसभा निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी सेना पुरस्कृत उमेदवाराला पाठींबा देत आपली उमेदवारी मागे घेतली. तरीही सेना पुरस्कृत उमेदवाराचा प्रचंड मतांनी पराभव झाला. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सेना पुरस्कृत उमेदवाराने बहुजन विकास आघाडीला चारी मुंड्या चीत केले होते. तिच किमया २०१४ मध्ये पुन्हा करणे शक्य झाले नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या मनपाच्या निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी चालवली आहे. केंद्र व राज्यात मिळालेला कौल लक्षात घेऊन भाजपाने सेनेकडून अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सेना-भाजपा युती झाली तरी, यंदा बहुजन विकास आघाडी कोणासमवेत आघाडी करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेले प्रचंड यश लक्षात घेऊन आघाडी या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही वसई विरारच्या मतदारांनी बविआला डोक्यावर घेतले होते.
बहुजन विकास आघाडीकडे ११५ जागांसाठी सुमारे ४ हजार उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे पक्षश्रेष्ठीची झोप उडाली आहे. असे असले तरी,आघाडीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाही. आमदार हितेंद्र ठाकूर यांचा दरारा व लोकांचा पक्षाला असलेला पाठींबा पाहता सहसा कोणीही बंडखोरी करण्याच्या फंदात पडत नाही. राष्ट्रीय पक्षाला जशी बंडखोरीची लागण होते तशी वसई-विरार उपप्रदेशातील क्रमांक एकच्या या पक्षाला आजवर कधीही बंडखोरीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागले नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्राण ओतण्याचे प्रयत्न सुरू केले, परंतु राष्ट्रवादी पक्षाने मात्र सपशेल नांगी टाकली आहे. नवी मुंबईत युतीला रोखण्याचे काम करणाऱ्या माजी पालकमंत्री गणेश नाईक येथील निवडणुकीमध्ये लक्ष घालतील, असा अंदाज होता. परंतु ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना आमदार ठाकूर यांनी धोबीपछाड दिल्यामुळे त्यांनीही येथील राजकारणात हस्तक्षेप करण्याचे टाळले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवण्याची शक्यता फार कमी आहे. कार्यकर्त्यांची उणीव असताना उमेदवार आणायचे कुठून अशा विवंचनेत वरीष्ठ पदाधिकारी सापडले आहेत. गेल्यावेळी ४२ उमेदवार रिंगणात होते परंतु एकालाही विजय मिळवता आला नाही. प्रभाग क्र. ६५ मध्ये त्यांच्या उमेदवाराला केवळ ९ मते मिळाली. गेल्यावेळी झालेल्या लढतीचे व निकालाचे चित्र लक्षात घेता यंदाची निवडणूक विरोधकांना सहज सोपी होणार नाही. एकसंघ बविआ विरूद्ध विस्कळीत विरोधक अशा लढतीमध्ये मतदार स्थिर कारभार देणाऱ्यांना पसंती देतील.

वसई विरार उपप्रदेशातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य सहकारी संस्थामध्ये आजवर राष्ट्रवादीचा एकही प्रतिनिधी प्रवेश करू शकला नाही. त्या निवडणुकीमध्ये भाजपा-सेना युतीदेखील सर्व जागा लढवू शकली नाही. एकुण ८९ प्रभागांपैकी सेना - ३८ व भाजपा - १२ अशा ५० जागांवरच ते उमेदवार उभे करू शकले. रीपाइंने ४ जागा लढवल्या पण सर्वांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की आली. बसपानेही पाच जागी आपले उमेदवार उभे केले परंतु त्यांची गतही रीपाइंच्या उमेदवारासारखी झाली. मनसेने १७ जागा लढवल्या त्यापैकी प्रफुल्ल पाटील हे विजयी होऊ शकले. त्यांनी प्रभाग २८ मध्ये बविआच्या कांती धनगर यांचा ४९१ मतांनी पराभव केला.

गेल्या निवडणुकीमध्येही काँग्रेसला सर्वच्या सर्व जागा लढवणे शक्य झाले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीचा प्रश्न चघळला गेला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे अवसान गळाले. वास्तविक निवडणुकांची तयारी ३ महिन्यापूर्वी व्हायला हवी, परंतु काँग्रेसमध्ये कोणताही निर्णय प्रक्रियेच्या अंतीम टप्प्यात घेण्यात येतो. चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी, उमेदवारांचे काय, महिला उमेदवार, तेही आरक्षणानुसार आणणार कुठून? या सर्वाचा विचार केला असता पक्षाला स्वबळावर निवडणुका लढणे शक्य होणार नाही. मात्र या निमित्ताने चव्हाण यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

Web Title: The ruling zodiac opponent comat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.