मुंबई : जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने परदेशात अस्तित्वात असलेल्या ‘हिप्पोथेरपी’ अर्थात, इक्वान थेरपीचा पहिला प्रयोग शनिवारी सकाळी महालक्ष्मी रेसकोर्सवर यशस्वीरीत्या पार पडला. या वेळी इंडियन कॅन्सर सोसायटी आणि अॅमच्युर रायडर्स क्लबच्या वतीने मुंबईतील कर्करोग रुग्णांनी सहभाग घेतला.‘हिप्पोथेरपी’च्या या पहिल्याच प्रयोगात सहभागी झालेल्या कर्करोग रुग्णांना घोडेस्वारीची ओळख, प्राथमिक टप्प्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी सहभागी झालेले कर्करोग रुग्णही आनंदाने या थेरपीचा आनंद लुटताना दिसून आले. शिवाय, अशा आगळ््या वेगळ््या थेरपीचा अनुभव भविष्यातही अनुभवण्याची सकारात्मक तयारी, या वेळी कर्करोग रुग्णांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.या थेरपीदरम्यान अॅमच्युर क्लबचे सुरेश टापडीया यांनी कर्करोग रुग्णांना घोड्याशी ओळख कशी करून घ्यायची, घोडेस्वारीचे प्राथमिक टप्पे, व्यायाम प्रकार आणि प्रात्यक्षिक स्वरूपातील मार्गदर्शन दिले. या थेरपीविषयी सांगताना टापडीया म्हणाले की, ‘३-४ वर्षांपूर्वी ९ वर्षांच्या मुलाला बसता येत नव्हते. त्या वेळी सहा महिने त्या मुलाला घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिल्यानंतर, तो बसू लागल्याची माहिती त्यांनी दिली. कर्करोग रुग्णांनाही ही थेरपी भारतात सहज उपलब्ध होण्यासाठी ठरावीक आराखडा केल्यास लाभदायक ठरेल.’ तर याविषयी, ‘पहिल्याच थेरपीचा प्रयत्न प्रातिनिधिक असून, भविष्यात या थेरपीविषयी मोड्यूल विकसित करून ते अवंलबिले जाईल,’ अशी माहिती इंडियन कॅन्सर सोसायटीचे वैद्यकीय संचालक डॉ.विनय देशमाने यांनी दिली. (प्रतिनिधी)
घोड्यांच्या सहवासात रमले कर्करोग रुग्ण
By admin | Published: February 05, 2017 4:25 AM