मुंबई : सकाळी गर्दीच्या वेळी लोकलला आग लागली, अशी अफवा पसरली. या अफवेमुळे एका तरुणीने लोकलमधून उडी घेतल्याची घटना बुधवारी घडली. संबंधित तरुणी या घटनेत जखमी झाली. आता तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तरुणीच्या वडिलांनी दिली.मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकावर आलेल्या लोकलला आग लागण्याची अफवा बुधवारी पसरली. यावेळी प्रवाशांनी पटापट लोकलमधून उड्या मारण्यास सुरुवात केली. लोकलचा वेग वाढल्यावर तरुणी अनिशा खैमानी (२१) हीनेदेखील फलाटावर उडी घेतली. यामध्ये ती जखमी झाली. तिच्या हनुवटीला मार लागला असून टाके लावण्यात आले आहेत, अशी माहिती अनिशाचे वडील दिनेश खैमानी यांनी दिली.अनिशा खैमानी पोद्दार महाविद्यालयातून घाटकोपर येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाली, यावेळी तिने माटुंगा रेल्वे स्थानकातून सकाळी १० वाजून ५०च्या सुमारास कल्याण दिशेकडील लोकल पकडली. फलाटावर लोकल थांबली असता, सर्व प्रवासी लोकलमधून चढले-उतरले. मात्र, लोकलच्या एअरप्रेशर ब्रेकमुळे लोकलमधून धूर निघाला. हा धूर पाहून लोकलला आग लागण्याची अफवा पसरली. यावेळी अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या घेतल्या. काही क्षणात लोकलने वेग धरून कल्याण दिशेकडे जात होती. यावेळी सहप्रवासी महिला लोकलमधून फलाटावर उड्या घेत असल्याचे पाहून अनिशाने लोकलमधून फलाटावर उडी घेतली. यामध्ये ती जखमी झाली, अशी माहिती अनिशाने वडील दिनेश खैमानी यांनी दिली.माटुंगा स्थानकावर आलेल्या लोकलला आग लागण्याच्या अफवेला तरुणीने लोकलमधून फलाटावर उडी घेतली. यात ती जखमी झाली. त्यानंतर, संबंधित तरुणीने खासगी रुग्णालय गाठले. या घटनेची नोंद करण्यात आली आहे़
आगीच्या अफवेने तरुणीने लोकलमधून घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:14 AM