Join us

मुंबई विमानतळावर हल्ल्याच्या अफवेने उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 7:20 PM

- पूर्वनियोजीत मॉकड्रील, प्रशासनाचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मुंबईविमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याच्या अफवेमुळे शनिवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. अचानक टर्मिनल २ खाली करण्याचे निर्देश मिळाल्यामुळे प्रवेशद्वारांवर गर्दी झाली. त्यामुळे प्रवाशांत घबराट पसरली. मात्र, हे पूर्वनियोजित मॉक ड्रील असल्याची घोषणा काही वेळाने करण्यात आल्याने त्यांच्या जीवात जीव आला.

अत्यंत गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी वेळोवेळी अशा उपाययोजना केल्या जातात. एखादा हल्ला किंवा विपरीत प्रसंग ओढावल्यानंतर ज्याप्रमाणे कृती केली जाते, अगदी तसेच चित्र उभे करून मॉकड्रील पार पाडले जाते. मुंबई विमानतळावर शनिवारी सकाळी अशाप्रकारे मॉकड्रील करण्यात आले. मात्र, सुरक्षारक्षकांची अचानक वाढलेली हालचाल पाहून प्रवासी भयभीत झाले. त्यात भर म्हणजे विमानतळाच्या टर्मिनल २ वरील प्रवाशांना तत्काळ बाहेर पडण्याच्या सूचना मिळाल्यामुळे तोंडचे पाणीच पळाले. विमानतळावर अतिरेकी हल्ला झाल्याच्या भीतीने त्यांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली. या स्थितीची छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने अफवेला खतपाणीच मिळाले.

शेवटी गोंधळ वाढत गेल्यामुळे हे मॉकड्रील असल्याची घोषणा करावी लागली. तेव्हा कुठे प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला. यादरम्यानच्या काळात अंतर नियमांना हरताळ फासण्यात आल्याने काही प्रवाशांनी याबाबत आक्षेप नोंदवला. कोरोनाकाळात प्रवाशांचा गोंधळ उडेल, अशी कृती करणे टाळायला हवे. भयभीत झालेल्या प्रवाशांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाच, शिवाय त्यांचा वेळही वाया गेला, अशी नाराजी अनेकांनी व्यक्त केली.

विमानतळ प्रशासन म्हणते...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी नियोजित प्रोटोकॉलनुसार दोन ठिकाणी मॉकड्रील घेण्यात आले. सर्व भागधारकांच्या सहकार्याने ते पार पडले. सर्व प्रकारची तपासणी झाल्यानंतर विमानतळ सुरक्षित असल्याची घोषणा करून ११ वाजून ४८ मिनिटांनी मॉकड्रील समाप्त करण्यात आले, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली. 

टॅग्स :विमानतळमुंबई