Join us

छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा शुक्रवारी दुपारी दिल्लीतील एम्स ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कुविख्यात डॉन छोटा राजन उर्फ राजन निकाळजे याचा शुक्रवारी दुपारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त आले आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचे निधन झाले नसून तो जिवंत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असा खुलासा त्यामुळे एम्सला करावा लागला. गुन्हेगाराच्या उपचारांबाबत असा खुलासा रुग्णालयाला प्रथमच करावा लागला.

एकेकाळी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेला छोटा राजन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद टोळीतून फुटून बाहेर पडला होता. दुबईतून पलायन केल्यानंतर तो अनेक देशांमध्ये लपूनछपून वास्तव्य करीत होता. त्याही काळात तो मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये सक्रिय होता. आपल्या हस्तकांमार्फत त्याने मुंबईत अनेक गुन्हे केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील अनेक आरोपींची हत्या करून त्याने आपण देशभक्त डॉन असल्याचा दावा केला होता.

२५ ऑक्टोबर २०१५ रोजी इंडोनेशियात बाली येथे विमानतळावर मोहन कुमार नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवास करीत असताना तो पकडला गेला. दरम्यान, तो फरारी असल्याबाबत भारत सरकारने आधीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. संशय आल्यानंतर छोटा राजनच्या बोटांचे ठसे तपासले असता त्याची ओळख पटली. त्याच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर त्याला ताब्यात देण्याविषयी भारत सरकारकडून इंटरपोलशी संपर्क साधण्यात आला. छोटा राजनचे भारतात प्रत्यार्पण केल्यापासून तो दिल्लीच्या तिहार कारागृहात आहे. २५ एप्रिल २०१७ रोजी बनावट पासपोर्टच्या गुन्ह्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्याला सात वर्षांची कारावासाची सजा सुनावली. त्याच्या नावावर ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे २५ एप्रिल रोजी उपचारासाठी त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.