Join us

सोशल मीडियावर अफवांचे पीक

By admin | Published: November 15, 2016 5:08 AM

पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अफवांचे पीक उठले आहे. मिठाच्या तुडवड्यापासून काळ्या पैशापर्यंत

मुंबई : पाचशे आणि हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अफवांचे पीक उठले आहे. मिठाच्या तुडवड्यापासून काळ्या पैशापर्यंत आणि बँकांच्या व्यवहारापासून एटीएमच्या घोळापर्यंतच्या अफवांनी मजल मारली आहे. विशेषत: विवाह समारंभाकरिता लागणारे पैसे बँकेतून काढण्यासाठी, डीसीपीची स्वाक्षरी ग्राह्य धरण्यात येणार असल्याच्या अफवेवर तर थेट पोलिसांनाच यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करावे लागले आहे. एकंदर पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्याचा व्याप सुरू असतानाच, अशाच काहीशा पसरलेल्या अफवांनी मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले असून, प्रशासनाद्वारे नागरिकांना यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.पाचशे आणि हजाराच्या नोट बदलण्यासाठी ३० डिसेंंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असतानाच, बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेवर मोठा कर लावण्यात येणार असल्याची अफवा पसरली. प्रत्यक्षात २.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल आणि त्यावरील रकमेसाठी उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागेल, शिवाय ते उत्पन्न बेकायदेशीर असेल, तर त्यावर २०० टक्के कर आकारण्यात येईल, असे सरकारला लोकांना वारंवार सांगावे लागले.बँकाचे आणि एटीएमचे व्यवहार ठप्प किंवा थंडावल्यानंतर, ठिकठिकाणी हाहाकार माजल्याच्या किंवा गोंधळ माजल्याच्या, हाणामारी झाल्याचा काही अफवा पसरू लागल्या. प्रत्यक्षात असे काही होत नसून, परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन सरकारला करावे लागले, शिवाय बँकाबाहेर आणि एटीएमबाहेरील गर्दीची छायाचित्रे अवास्तव फिरल्याने, नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली. प्रत्यक्षात मात्र, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रासह राज्याने करत, नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहनही वारंवार करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)