Join us

सोशल मीडियावर दहावी व बारावीच्या निकालाच्या तारखांची अफवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:42 AM

शिक्षण मंडळाचा खुलासा : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

मुंबई : सध्या बोर्डाच्या लोगोसह बारावी व दहावी निकालाच्या तारखा सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत. मात्र, अद्याप बोर्डाने निकालाच्या तारखा प्रसिद्ध केलेल्या नाहीत. त्यामुळे नेमका कधी निकाल जाहीर होणार, हे कळत नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या निकालाच्या तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे, तसेच या केवळ अफवा असल्याचा खुलासा केला आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी व दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत अधिकृत ई-मेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे व मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, दरवर्षीप्रमाणेच यंदाही दहावी, बारावीच्या निकालाचा महिना येताच सोशल मीडियावर निकालाच्या खोट्या तारखा व्हायरल होणे सुरू झाले आहे. त्या खोट्या असल्याचे परिपत्रकही बोर्डाने दरवर्षीप्रमाणे काढले आहे. मात्र, आता याचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीकोनातून या अफवांचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :परीक्षा