‘विमानात बॉम्ब’ निघाली अफवा; प्रवाशांचा सात तास खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 05:50 AM2024-03-02T05:50:21+5:302024-03-02T05:50:35+5:30
‘अकासा’च्या मुंबई - बंगळुरू विमानाबाबत खोडसाळपणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईहून बंगळुरूसाठी उड्डाणाच्या तयारीत असलेल्या अकासा कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी अकासा कंपनीच्या कॉल सेंटरला आल्यानंतर मुंबई विमानतळावर एकच धावपळ उडाली. मात्र, संपूर्ण सुरक्षा तपासणीनंतर हा खोडसाळपणा असल्याचे निदर्शनास आले व सात तासांच्या विलंबाने अखेर त्या विमानाने बंगळुरूसाठी उड्डाण केले. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर घडली. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस आता आरोपीचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईहून बंगळुरूला अकासा कंपनीचे विमान सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करणार होते. त्याअगोदर जेमतेच चार मिनिटे म्हणजे ६ वाजून ३६ मिनिटांनी अकासा कंपनीच्या मालाड येथील कॉल सेंटरमध्ये एका अज्ञाताने दूरध्वनी करत त्या विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने अकासा कंपनीच्या विमानतळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही माहिती तातडीने उड्डाणाच्या तयारीत असलेल्या संबंधित विमानाच्या वैमानिकाला कळवली. त्याने विमान वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाशी संपर्क साधला.
आपद्कालीन परिस्थितीसाठी निश्चित केलेल्या नियमावलीनुसार विमान बाजूला नेण्यात आले. विमानात बसलेल्या १६७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने विमानाची संपूर्ण तपासणी केली असता ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या सर्व प्रक्रियेअंती सात तासांच्या विलंबानंतर रात्री दीड वाजता विमानाने बंगळुरूसाठी उड्डाण केले.