मुंबई/पुणे - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे. शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. याशिवाय महिनाभरापूर्वी शिंदे यांना मारण्याची धमकी देणारे पत्र मंत्रालयात आले होते, तर धमकीचा एक निनावी फोनही आला होता. यापूर्वी मागील सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे, शिंदेंना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने केवळ हॉटेलचे बील चुकविण्यासाठी ही अफवा पसरवल्याचे आता तपासात समोर आले आहे. पुण्याच्या कॉल सेंटरमधील एका तरुणाने पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या रागातून मॅनेजरला त्रास देण्यासाठी दारूच्या नशेत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना जिवे ठार मारण्याचा प्लॅन चालू असल्याचा कॉल १०० नंबरला केल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी आता या आरोपीला अटक केली आहे. अविनाश आप्पा वाघमारे (वय ३६, रा. रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी कलम १७७ नुसार गुन्हाही दाखल केला आहे. लोणावळ्यातील हॉटेल साईकृपा येथे हा प्रकार घडला. दारूच्या नशेत वाघमारे याचा मॅनेजर किशोर पाटील यांच्याशी पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याने वाद झाला. नंतर मॅनेजरला त्रास देण्यासाठी उद्देशाने त्याने १०० क्रमांकाला कॉल केला.
अविनाश वाघमारेने साईकृपामध्ये काही लोक बसले असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा प्लॅन करीत आहेत, असे खोटे सांगितले. मुंबई-बंगळुरू रोडवरील खेड शिवापूर येथे ट्रॅव्हल थांबवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा