समाजमाध्यमांवर संप मागे घेतल्याच्या अफवाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 04:48 AM2018-10-27T04:48:53+5:302018-10-27T04:49:03+5:30
व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि टिष्ट्वटर या समाजमाध्यमांवर अॅप बेस टॅक्सी संप मागे घेतल्याच्या केवळ अफवाच व्हायरल होत आहेत.
मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि टिष्ट्वटर या समाजमाध्यमांवर अॅप बेस टॅक्सी संप मागे घेतल्याच्या केवळ अफवाच व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात मागण्या पूर्ण होईपर्यंत अॅप बेस्ड टॅक्सी चालकांचा संप मागे घेण्यात येणार नाही. परिणामी, सलग पाचव्या दिवशीही संप कायम राहणार आहे.
फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांवर ओला व्यवस्थापनाकडून अॅप बेस टॅक्सी चालक-मालकांची दिशाभूल करण्यात येत आहे. ‘संप मिटला असून आता सर्व भागीदारांनी वाहने सुरू करावीत,’ असे चुकीचे संदेश व्हायरल करण्यात येत आहेत. मात्र ओला-उबर व्यवस्थापनाकडून कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने अॅप बेस टॅक्सींचा संप शनिवारीदेखील कायम राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने दिली.
मूळ भाडे १०० ते १५० रुपये आणि प्रतिकिलोमीटर १८ ते २३ यादरम्यान असावे, या आणि अन्य मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू असलेला संप कायम राहणार आहे. संप मोडण्यासाठी ओला-उबर व्यवस्थापन आणि पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर होत आहे. मात्र चालक-मालकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्यात येईल. शनिवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयानंतर संपाबाबत पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती अनंत कुटे यांनी दिली.
संपामुळे अॅप बेस्ड टॅक्सीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. शहरात प्रवास करण्यासाठी बहुतांशी मुंबईकर रेल्वेसह बेस्ट आणि मेट्रोचा आधार घेत आहेत. त्याचबरोबर काहीअंशी काळ्या-पिवळ्या टॅक्सींनीदेखील काही प्रवासी प्रवास करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.