कऱ्हाडमधील शाळकरी मुलाचे कृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हॉटेल ताजमध्ये शनिवारी आलेल्या एका अफवेच्या फोनमुळे हॉटेल प्रशासन व तेथील सुरक्षा यंत्रणांची काही काळ धावपळ उडाली. मात्र, १४ वर्षाच्या एका शाळकरी मुलाने मस्करीतून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा सुसुस्कारा सोडला. पश्चिम महाराष्ट्रातील कऱ्हाड शहरातून हा फोन करण्यात आला होता.
हॉटेलमध्ये मागच्या दरवाजातून दोन अतिरेकी शिरणार आहेत, असा फोन दुपारी ३.३०च्या सुमारास मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आला होता. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवून संपूर्ण परिसर धुडाळून काढण्यात आला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. आलेल्या मोबाईल नंबरवरून त्याचे लोकेशन शोधले असता ते कऱ्हाडमधील एका सामान्य नागरिकाचा असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक पोलिसांना कळवून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये त्याच्या नववीत शिकत असलेल्या मुलाने मोबाईल घेऊन हा फोन केल्याचे समजले. या कृत्याबद्दल पिता-पुत्रांना समज देऊन सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.