Join us

आंबेनळी घाटात महिला पडल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 5:52 AM

बचावकार्याची तीन तासांची मेहनत वाया

पोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट अत्यंत संवेदनशील बनत चालला आहे. रविवार सायंकाळी घाटामार्गावर पुन्हा एकदा गिर्यारोहकांची एकजूट पाहायला मिळाली. आंबेनळी घाटात एक महिला खाली गेल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी गर्दी जमू लागली. या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना कळवल्यावर सहायक निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक अनिल अंधेरे आदी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गिर्यारोहक शिवमुद्राचे अजित जाधव, सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारटे आदी सहा जण सायंकाळी सुमारे १२०० फूट खोल दरीत उतरले. या वेळी पाहणी केली असता महिलेऐवजी भाजीचे पोते पडल्याचे दिसून आले.

जीव धोक्यात घालून गिर्यारोहक दरीत उतरले खरे मात्र अंधार होऊ लागल्याने आणि पावसाने जोर पकडल्याने सहाही गिर्यारोहक दरीत अडकले. अखेर त्यांच्या मदतीला महाबळेश्वर ट्रेकर्सचे २० ते २५ जण धावून आले. त्यांनी पुन्हा खोल दरीत उतरून अडकलेल्या ट्रेकर्सना सुखरूप दरीतून काढले. या रेस्कू आॅपरेशनचा थरार तीन तास चालू होता.‘अफवा पसरवू नका’च्कोणतीही शहानिशा न करता अफवा पसरवून गिर्यारोहकांच्या जीवाशी खेळणे चुकीचे आहे. यापुढे प्रत्येक घटनेची सखोल माहिती घेतल्याशिवाय ट्रेकर्सनेही अशी जोखीम घेऊ नये, अशा सूचना पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिल्या.

टॅग्स :मुंबईमहिला