लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर गणेशोत्सवाची लगबग सुरु होईल. या उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे जोखीम वाढली आहे. त्यामुळे या काळात विमा घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. मंगळवारी होणाऱ्या दहिहंडीच्या उत्सावासाठी तब्बल ९० हजार हून अधिक गोविंदांनी विमा सुरक्षा घेतल्याचे दिसून येत आहे. काही कंपन्यांनी उत्सव काळासाठी विम्याच्या प्रीमियममध्ये पाच पट वाढ केली. सामान्यपणे गोविंदांना प्रत्येकी ७५ रुपयांच्या प्रीमियममध्ये १० लाखांची विमा सुरक्षा कंपन्या देत आहेत.
राज्य सरकारनेही उत्सव काळात सुरक्षेचे अधिकाधिक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सचिन खानविलकर यांनी सांगितले की, राज्य सरकार आणि वसई-विरार नगरपालिकेने गोविंदा आणि मंडळांच्या विमा सुरक्षेसाठी ६० लाखांचा प्रिमियम भरला आहे.
कशासाठी सुरक्षा?
- इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुमित बोहरा यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने लोक सहभागी होत असल्याने सरकारने अपघातांचे नुकसान कमी करण्यासाठी अधिकाधिक लोकांना कसे कव्हरेज देता येईल यासाठी प्रयत्न केला आहे.
- दहिहंडी फोडताना पडून जखमी झालेले गोंविदा, गणपतींच्या मिरवणूक तसेच विसर्जनावेळी होणारे अपघात, मंडपात आग तसेच विजेमुळे होणाऱ्या दुर्घटना, मूर्तीचे होणारे नुकसान आदींसाठी विमा घेण्याचे प्रमाण वाढत आहे.