लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘आपली एखादी इच्छा किंवा अडलेले काम पूर्ण करण्यासाठी होम हवन आणि पूजा घालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. आता तसाच काहीसा प्रयत्न मालवणीच्या गायकवाड नगरातील स्थानिकांनी करण्याचे ठरवले आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्यांचे समाधान करावे, यासाठी आता पूजा तसेच होम हवन करून म्हाडा अधिकाऱ्यांना प्रसन्न करून न्याय मागण्याची तयारी सुरू केली आहे.
मालवणी येथील गायकवाडनगर परिसरातील रहिवाशांना गेल्या ३० ते ४० वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी अनेक निवेदने दिल्यावर लोकप्रतिनिधींना भेट दिली. तरी दुरुस्ती मंडळाकडून रहिवाशांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे तीन जानेवारी, २०२२ पासून कुराण पठण व इतर धार्मिक स्थळांना भेट देऊन पूजाअर्चा करण्याचे नागरिकांनी ठरविल्याचे गायकवाड नगर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले.
कित्येक वर्षांपासून मालवणी गायकवाड नगर येथील रहिवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हाडाने झोपडपट्टी विभागातील नागरिकांना सहा ते आठ लाखांची थकबाकी वसुलीची नोटीस पाठविली आहे. या नोटिसी बघून नागरिक हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधींनीही हात वर केले आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या या नागरिकांना म्हाडाने न्याय द्यावा, नागरिकांना म्हाडाने योग्य दंड आकारून सवलतीच्या दरात खोली अलॉट करावी यासाठी रहिवाशांनी अनेक पत्रव्यवहार केले आहे.
कुराण पठणाने प्रारंभयोग्य न्याय मिळत नसल्याने आता रहिवाशांनी देवांना साकडे घालण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात तीन जानेवारीपासून कुराण पठण करून करण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा विविध धार्मिक पूजाअर्चा करून न्यायासाठी अधिकाऱ्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नागरिक करणार आहेत.