Join us

स्लेजिंगचा रनरेट घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:07 AM

- संकेत गोलतकर..........................(इंट्रो १)ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका म्हटल्यावर मैदानावरील खेळापेक्षा शाब्दिक युद्ध सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते. मात्र, आता उभय ...

- संकेत गोलतकर

..........................

(इंट्रो १)

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका म्हटल्यावर मैदानावरील खेळापेक्षा शाब्दिक युद्ध सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते. मात्र, आता उभय संघांमधील बहुतांश खेळाडू हे आयपीएलमध्ये एकत्रित खेळत असल्यामुळे वादविवादांचे प्रसंग काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळेच स्लेजिंगची ‘खेळी’ आता संपत चालली असल्याचे दिसते आहे.

...........................

(इंट्रो २)

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेटविश्वातील दोन बलाढ्य संघ. दोन्ही संघांमधील सामने क्रिकेटरसिकांसाठी मोठी मेजवानीज असते. अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभव झोंबत असताना भारताने जबरदस्त पुनरागमन करत यजमान ऑस्ट्रेलियाला मेलबर्नमध्ये मोठा धक्का दिला. त्यामुळे भारताला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधता आली. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरू असलेल्या मालिकेत दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये थोडेफार शाब्दिक वार झाले, मात्र दोन्ही संघांतील खेळाडूंनी ते हसण्यावारी नेले. यानिमित्ताने भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान काही गाजलेल्या स्लेजिंग प्रकरणांवर टाकलेली नजर...

....................................

भारत - ऑस्ट्रेलिया मालिकांना अनेकदा खराब पंचगिरीचा फटका बसला आहे. २००८ सालचा दौरा हा अनेक वादविवादांवरून चांगलाच गाजला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात आलेली सिडनी कसोटी भारतीय क्रिकेटप्रेमी अजूनही विसरलेले नाहीत. भारतीय संघ सिडनी कसोटी जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. खेळपट्टीवर उभे असलेले सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये आठव्या गड्यासाठी १२९ धावांची भागीदारी झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ॲण्ड्रू सायमंड्सने हरभजनला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राग अनावर झालेला हरभजन स्वत:ची विकेट गमावून बसला. हरभजनने तंबूमध्ये परतताना सायमंड्सला अपशब्द वापरले. त्यानंतर हे प्रकरण पुढे ‘मंकी गेट’ म्हणून ओळखू जाऊ लागले. या सामन्यात खराब पंचगिरीचा फटका भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात बसला.

...................................

ऑस्ट्रेलियाचा संघ २००८ साली भारत दौऱ्यावर आला होता. दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचा डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरने धाव घेत असताना मुद्दामहून शेन वॉटसनला आपला डावा कोपरा मारला होता. त्यामुळे गौतम गंभीरवर चार कसोटी सामन्यांची बंदीही घालण्यात आली होती. गंभीरने तेव्हा सायनन कॅटीचबरोबरसुद्धा पंगा घेतला होता.

...........................................

भारतीय संघ २०१४ ला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला असताना ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने विराट कोहलीला अपशब्द वापरून त्याच्या दिशेने चेंडू फेकला होता. त्यानंतर कोहलीने आक्रमक पवित्रा घेत जॉन्सनवर हल्ला चढविला होता.

............................

२०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने रोहित शर्माला इंग्लिशमध्ये सुनावले होते. तेव्हा, रोहितही चांगलाच संतापला होता. त्या वेळेला पंचांनी मध्यस्थी करीत हे प्रकरण थांबविले होते. डेव्हिड वॉर्नरच्या सामन्यातील मानधनातून ५० टक्के रक्कम त्याला दंड ठोठावण्यात आला होता.

......................................

भारताने २०१८ साली ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण त्याआधी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर आला होता. बंगळुरू येथील कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ यांनी एकमेकांच्या नकला करून सर्वांचेच मनोरंजन केले होते. ईशांतच्या केलेल्या हावभावावरून सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल झाले होते.