मुंबई : सौरऊर्जा तयार करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याच्या अंमलबजावणीवर सर्वांनी भर द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा वापरून ७००० मेगावॅट वीजनिर्मिती करणे; आणि २०२५ पर्यंत ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविणे, असे 'मिशन २०२५' या अभियानाच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले आहे.
शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, ग्रामपंचायत कार्यालये सौरऊर्जेवर चालविण्याचाही विचार व्हावा, अशी सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २० या अभियानाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिव, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या प्रकल्पांसाठी ज्या वेगाने जमिनी उपलब्ध होतील त्या वेगाने कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविता येतील. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन भाड्याने दिली तर त्यांना दरवर्षी हेक्टरी सव्वा लाख रूपये भाडे मिळेल. जमीन उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आपला जिल्हा सर्वप्रथम शेतीसाठी शंभर टक्के सौरऊर्जा वापरणारा होईल व जिल्ह्यात शेतीला २४ तास वीज उपलब्ध होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठेवावे. सौरऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा वापर केला तर शेतीसाठी कमी दरात वीज उपलब्ध होईल आणि उद्योगांसाठीच्या वीजदरात लागू केलेली क्रॉस सबसिडी कमी होईल.