मुंबई : सर्व लोकल रेल्वे सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुयारी रेल्वेचा किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा पर्याय अवलंबावा जेणेकरून जलद लोकल आणि मेल-एक्सप्रेस भुयारी मार्गातून, तर स्लो लोकल ब्रिजवरून चालवल्या जातील, अशी मागणी आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेने केली आहे.
संघटनेने पश्चिम रेल्वेच्या डीआरएमकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यांत एसी लोकलचे तिकीट दर कमी करून सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात, ही प्रमुख मागणी आहे. लोकलच्या गर्दीवर नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र झोन बनवावेत. पश्चिम रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात. एसी लोकलसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत. त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे. सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३० टक्के प्रवासीच त्यातून प्रवास करतात. परिणामी त्याचा मागील लोकलवर भार येऊन प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागतो.
विरार ते चर्चगेट एसी लोकलचा मासिक पास २२०० रुपये आहे. १२ ते १५ हजार रुपये कमावणाऱ्यांनी काय करावे? म्हणून साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा किंवा ते शक्य नसल्यास सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉन-एसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरात चालवाव्यात. एसीचे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत. जेणेकरून जनरल, फर्स्ट क्लास आणि एसी असे तिन्ही वर्गांचे प्रवासी एकाच लोकलने प्रवास करतील.- यशवंत जड्यार, आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटना