Join us

जंगल संवर्धनाच्या जनजागृतीसाठी धावण्याचा उपक्रम

By admin | Published: December 05, 2015 9:08 AM

जंगल संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते कोटश्वर म्हणजेच भारताच्या सागरी किनाऱ्याच्या दक्षिण टोकापासून उत्तर पश्चिम टोकापर्यंत धावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबई : जंगल संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते कोटश्वर म्हणजेच भारताच्या सागरी किनाऱ्याच्या दक्षिण टोकापासून उत्तर पश्चिम टोकापर्यंत धावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये कोकणातील मालवण, चिपळूण आणि अलिबागचा समावेश असून, बंगळुरू येथील जगदीश दमानिया यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था या उपक्रमाचा एक भाग आहे.या उपक्रमात पश्चिम घाटालगतच्या गावांचा अभ्यास केला आहे. येथील काही जागा निश्चित करून एक वर्षाच्या काळात तीनशे एकर जंगल जमीन लोकसहभागातून विकत घेत त्यावरील जंगल वाढीस लावले जाईल. त्यातील ९० टक्के जागा जंगल संवर्धन उद्दिष्टासाठी वापरली जाईल. झाडांच्या विविध प्रजातींच्या अभ्यासासाठी साधारण ५ टक्के जागा वापरली जाईल. या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी ५ टक्के जागा राखली जाईल. याच उपक्रमामधील चिपळूण येथील दौडचे पूर्ण दौड आणि जनजागृती दौड असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्ण दौड २४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता कुंभार्ली घाटमाथ्यापासून सुरू होईल; आणि जनजागृती दौड बहादूर शेख नाक्यापासून सुरू होईल, असे काटदरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)