धावत्या कारमध्ये १८ मिनिटे रंगला होता हत्येचा थरार; काळाचौकी पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:27 AM2019-12-08T03:27:23+5:302019-12-08T05:57:10+5:30
रात्रीच्या अंधारात मुंबईत एका धावत्या कारमध्ये १८ मिनिटे हत्येचा थरार रंगल्याचा प्रकार काळाचौकी मर्डर मिस्ट्रीतून समोर आला आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : रात्रीच्या अंधारात मुंबईत एका धावत्या कारमध्ये १८ मिनिटे हत्येचा थरार रंगल्याचा प्रकार काळाचौकी मर्डर मिस्ट्रीतून समोर आला आहे. पोलिसांनी कुठलाही धागा हाती नसताना शिताफीने वेश बदलून उत्तर प्रदेशात या गुन्ह्यातील दुकलीला बेड्या ठोकल्या, तर एका पसार आरोपीचा शोध सुरू आहे.
कॉटनग्रीन येथील बीपीटी पे अँड र्पाकिंगलगत असलेल्या रोडवर २३ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजून १० मिनिटांनी एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात काळाचौकी पोलिसांना सापडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) हिरे आणि पथकाने तपास सुरू केला. तीन पथके नेमण्यात आली. गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला.
सुरुवातीला तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यात तरुणाच्या अखेरच्या क्षणाला ‘मैया मैया’च्या शब्दांनी पोलिसांनी तो झारखंडचा असल्याचा अंदाज बांधून तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच, यादव कुटुंबीय पोलिसांच्या संपर्कात आले आणि मृत व्यक्ती सामदेव ईश्वर यादव (३०) असल्याचे स्पष्ट होताच तपासाला गती मिळाली.
यादव हा कामाठीपुरामध्ये दलाल म्हणून काम करायचा. त्यात पोलिसांनी खबऱ्यांच्या पेरलेल्या जाळ्यातून उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आले. त्यानुसार, एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. तेथील पेहराव घालून त्यांचा तपास सुरू झाला. अखेर, ३ डिसेंबरला एकाला शेतातून तर एक हॉटेलमधून पोलिसांच्या हाती लागला. रवी महेश आनंद (३२), रितिक विनोद सुरीया या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, यातील पसार आरोपी कार चालवत होता, तर यादव शेजारी एक तर पुढे एक आरोपी बसला होता.
यात, लॅमिन्टन रोड येथे पोहोचताच एका इमारतीलगतच सुरुवातीला शेजारच्याने यादवच्या पोटात चाकू भोसकला. तोच पुढे बसलेल्या आरोपीने त्याचे केस ओढून त्याला स्वत:कडे ओढले आणि त्याच्या मानेवर, पाठीवर वार केले. मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल १८ मिनिटे हा हत्येचा थरार सुरू होता. यात तब्बल १३ वार करत, पुढे पोलीस असल्याची कुणकुण लागताच, त्याला कॉटनग्रीन येथे टाकून तिघांनी पळ काढला. अटक करण्यात आलेल्या दुकलीपैकी रवी हा सराईत गुन्हेगार असून, त्याचा शोध सुरू आहे.
हत्येमागचे गूढ कायम
प्राथमिक चौकशीत यादवकडील ६० हजार चोरी करण्यासाठी दारूच्या नशेत हत्या केल्याचे दुकलीने सांगितले आहे. मात्र, यामागे वेगळेच कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. पैसे, मुलगी की पूर्ववैमनस्य याबाबत अधिक तपास सुरूआहे.