भार्इंदर : भार्इंदर व नायगावदरम्यान असलेल्या पाणजू या बेटसदृश गावातील वीजकेबल व जलवाहिन्या धोकादायक ठरलेल्या असून बंदावस्थेतील जुन्या रेल्वे पुलावरून टाकण्यात आल्या आहेत. त्या काढून टाकण्याचे लेखी फर्मान पश्चिम रेल्वेने संबंधित शासकीय यंत्रणांना दिल्याने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांची सध्या वीज व पाणी वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नरवीर चिमाजी आप्पांच्या वसई किल्ल्यातील चढाईवेळी अस्तित्वात आलेल्या व तब्बल २१ स्वातंत्र्यसैनिकांचे गाव असलेल्या पाणजू बेटावरील प्रशासकीय कारभार जिल्हा परिषदेमार्फत चालविला जात आहे. सुरुवातीपासून गावात असलेली पाणी व वीजटंचाई १९८६ मध्ये त्या वेळचे आ. डॉमनिक गोन्सालवीस यांच्या प्रयत्नाने संपुष्टात आली. त्या वेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला पश्चिम रेल्वेने प्रत्येकी २२ केव्हीच्या दोन केबल्स टाकण्याची परवानगी दिली होती. त्यापैकी सध्याच्या महावितरणने एकच केबल टाकली असून दुसरी केबल अद्याप टाकलेली नाही. सध्याची केबल जीर्ण झाल्याने त्यात बिघाड झाल्यास गाव अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसरी केबल टाकण्यासाठी महावितरणने २६ नोव्हेंबर २०१४ रोजी रेल्वेकडे परवानगी मागितली होती. त्यावर रेल्वेने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.४गावातील विजेची केबल वसई-विरार पालिकेच्या हद्दीतून तर जलवाहिनी मीरा-भार्इंदर पालिकेच्या हद्दीतून नेण्यात आली आहे. या दोन्ही वाहिन्या वसई खाडीवरील जुन्या रेल्वेपुलावरून टाकण्यात आल्या असून १९९१ मध्ये हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने तो भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. ४त्यानुसार, रेल्वेने १२ जानेवारी २०१५ रोजी महावितरणसह स्टेमला पत्र पाठवून टाकलेल्या वाहिन्या काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत, गावचे माजी सरपंच प्रभाकर भोईर यांनी सांगितले की, रेल्वेने गावातील वीज व पाणी बंद करू नये. त्यावर मार्ग काढणे अपेक्षित असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. ४पश्चिम रेल्वेच्या पूल विभागाने सांगितले की, गावाने केबल व जलवाहिनीला नवीन रेल्वे पुलावर स्थलांतर करण्यास परवानगी मागितल्यास त्यावर कार्यपद्धतीनुसार निर्णय घेण्यात येईल. महावितरणच्या वसई विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सांगितले की, रेल्वेने जुना पूल काढू नये. त्यावर दुसरी केबल टाकण्यासाठी परवानगी द्यावी. अन्यथा, इतर सोयीस्कर पर्याय सुचवावा.
ग्रामस्थांची वीज वाचविण्यासाठी धावपळ
By admin | Published: March 23, 2015 10:50 PM