लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सोशल मीडियावरील लाईक आणि शेअरिंगसाठी तरुणाई सध्या जीवघेणे स्टंट करताना दिसत आहे. दक्षिण मुंबईत अशाच प्रकारे चालत्या टॅक्सीमधील स्टंटबाजीसह रेल्वे पुलाच्या पायऱ्यांवर सायकलिंगच्या करामती करणे चार तरुणांना भलतेच महागात पडले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला स्टंटबाजीचा हा व्हिडीओ आझाद मैदान पोलिसांपर्यंत पोहोचताच त्यांनी गुन्हा नोंदवत चौघांपैकी एकाला ताब्यात घेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी स्टंटबाजी आणि त्यावर झालेल्या कारवाईचा व्हिडीओदेखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला.
व्हिडीओमध्ये दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर पहाटेच्या सुमारास या चारजणांनी केलेले स्टंट चित्रीत करण्यात आले आहे. यामध्ये कोणी बसथांब्यासह विजेचे खांब, ट्रकवरून उडी मारत आहे, तर कोणी रेल्वेपुलाच्या पायऱ्यांवर सायकलिंग करताना दिसत आहे. त्यानंतर या चारजणांनी चालत्या टॅक्सीच्या खिडकीत बसून स्टंट केल्याचेही दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कौतुकाबरोबरच जबाबदारीने वागण्याचाही सल्ला देण्यात आला. पोलिसांनी मात्र या जीवघेण्या स्टंटला आक्षेप घेतला आहे.
आझाद मैदान पोलिसांनी या चारजणांचा शोध घेऊन त्यातील एकाला चेंबूरमधून ताब्यात घेतले. मेहुल पाजी चाराणीया (वय २०) असे तरुणाचे नाव असून, पोलिस चौकशीत त्याने ४ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर अन्य तीन मित्रांसोबत सायकलिंग आणि फ्लीपिंग करत स्टंटबाजी केल्याची कबुली दिली. त्याचे अन्य तीन मित्र उत्तराखंडला गेले असल्याने ते येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन तडाखे यांनी सांगितले. तरुणाने झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांची माफी मागितली.
इंडिया गॉट टॅलेंटसाठी बनवला व्हिडीओ
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहुलने इंडिया गॉट टॅलेंटमध्ये जायचे होते म्हणून तो व्हिडीओ तयार केल्याचे स्पष्ट केले. तसेच लवकरच उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असल्याचेही त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले.
यापूर्वीच्या घटना अन् हात, पाय गमावले
लोकलला लटकून स्टंट करायचे आणि त्याचे रील करण्याची मस्ती वडाळा येथील रहिवासी फरहत आझम शेख या तरुणाला यापूर्वी भलतीच महागात पडली होती. ही स्टंटबाजी करताना त्याला हात आणि पाय गमवावा लागला. विशेष म्हणजे याआधी असाच स्टंट करताना पोलिसांनी त्याला पकडलेदेखील होते. मात्र, त्यावेळी समज देत त्याला सोडण्यात आले.
शिवडी स्थानकावर स्टंटबाजी करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर १४ जुलै रोजी व्हायरल झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, १४ जुलैलाच मशीद बंदर स्टेशनवर स्टंट करताना झालेल्या अपघातात फरहतने डावा हात आणि पाय गमावल्याचे समोर आले.
खिडकीला लटकून चालवली कार
यापूर्वी जीवघेण्या स्टंटच्या प्रकरणी मद्यधुंद अवस्थेत खिडकीला लटकून कार चालविणाऱ्या सूरज साव (२६) याला पोलिसांनी अटक केली होती. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर असलेल्या ड्रॅगन फ्लायओव्हरजवळ ३० जुलैला ही घटना घडली होती.