धावपट्टू असलेल्या वॉर्ड ऑफिसरने कोरोनाला ठवले दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:22 PM2020-09-03T18:22:37+5:302020-09-03T18:23:03+5:30
आता कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई: पालिकेचा के पश्चिम वॉर्ड हा पश्चिम उपनगरातील महत्वाचा वॉर्ड समजला जातो. विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम मिळून सुमारे साडेसहा लाख लोकवस्तीचा हा वॉर्ड आहे.गेल्या दि,11 मार्च रोजी या वॉर्ड मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता. गेल्या एप्रिल,मे व जून महिन्यात हा वॉर्ड कोरोनाचा हॉट स्पॉट झाला होता.सुमारे 3000 नागरिकांची क्षमता असलेले कोरोना केअर सेंटर 1 आणि 415 नागरिकांची क्षमता असलेले कोरोना केअर सेंटर 2 ची उभारणी केली.कोरोना बाधीत रुग्णांना वेळीच हॉस्पिटलमध्ये उपचार मिळण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी,कोरोना रुग्ण शोध मोहिम हाती घेणे,नागरिकांच्या टेस्ट करणे आदी कामात गेली 6 महिने के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आणि त्यांची टीम अविरत मेहनत घेत आहे.त्यामुळे आज या वॉर्डमध्ये आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असून येथील जनजीवन आता सुरळीत होऊ लागले आहे. काल पर्यंत के पश्चिम वॉर्ड मध्ये कोरोनाचे 8246 रुग्ण होते,त्यापैकी 7158 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 907 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
एकीकडे के पश्चिम वॉर्ड मधील कोरोना नियंत्रणात आणतांना मोटे यांच्या टीम मधील काही अधिकारी व घनकचरा विभागातील 7 ते 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांना धिर दिला,वेळीच उपचार केल्याने त्यांचे टीम सदस्य बरे झाले. मे महिन्यात तर त्यांना आणि या वॉर्डच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरनार खान यांना त्रास जाणवू लागला.जर टेस्ट केली असती तर ती पॉझिटिव्ह आली असती,आणि टीमच्या कॅप्टनला कोरोनाची लागण झाल्याने टीमचे मनोबल खचले असते.मात्र स्टीम घेणे व सकाळी फळे घेणे आणि अन्य उपाय केले.रोज धावण्याची असलेली सवय व रोगप्रतिकारक शक्ति जास्त असल्याने लवकर रिकव्हर झालो. तुम्ही रोज योगा, व्यायाम करत असाल आणि धावत असाल तर तुमची रोगप्रतिकार शक्ति वाढते.आणि कोरोनाला तुम्ही दूर ठेवू शकता हे या वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
शालेय जीवनापासून खेळाची आवड असलेल्या मोटे यांना धावण्याची व पोहण्याची विशेष आवड आहे. उत्कृष्ट क्रीडापट्टू म्हणून त्यांनी जिल्हा व विभागीय पातळीवर कामगिरी केली असून अनेक पारितोषिके मिळवली आहे.गेल्या तीन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते बिकेसी व्हाया सिलिंक व परत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स व्हाया माहिम कॉजवे असे त्यांनी 42 किमीच्या दोन पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किमीच्या 12 अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. 2019 मध्ये मुंबई ते बिकेसी व्हाया सीलिंक अशी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन त्यांनी त्यांच्या 42 व्या वाढदिवसाला पूर्ण केली. मॅरेथॉन पूर्वी दक्षिण मुंबईत रेसकोर्स परिसरात तीन महिने रोज पहाटे 5.30 वाजता वेळ काढून व सुट्टीच्या दिवशी ते आठवड्यात 50 ते 60 किमी धावण्याचा सराव करत होते. लॉकडाऊन मध्ये के पश्चिम वॉर्डमधील कोरोनाचा हॉट स्पॉट कमी करून येथील नागरिकांना कोरोनामुक्त करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या टीमने अविरत मेहनत घेतली. त्यामुळे रोजच्या धावण्यात काहीसा खंड पडला होता.सरकारने गेल्या जुलै महिन्यात नियम थोडे शिथील केल्यानंतर दि, 15 जुलै पासून त्यांनी धावण्यास पुन्हा सुरवात केली आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.