Join us

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मुंबई विमानतळाची धावपट्टी आजही सहा तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 6:30 AM

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर, सोमवारप्रमाणेच मंगळवार, १० एप्रिलला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी सहा तासांसाठी बंद राहणार आहे.

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर, सोमवारप्रमाणेच मंगळवार, १० एप्रिलला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धावपट्टी सहा तासांसाठी बंद राहणार आहे. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य आणि दुय्यम धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.मुंबई विमानतळावरून रोज सुमारे ९०० विमानांचे उड्डाण होते. या क्षमतेत वाढ करून दर दिवशी एक हजार विमान वाहतुकीचे लक्ष्य गाठण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने दिली. धावपट्टी बंद असल्याबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (एमआयएएल) सर्व विमान कंपन्यांना गेल्या महिन्यात माहिती दिली होती. दोन दिवसांच्या प्रत्येकी सहा तासांमध्ये एअर इंडियाच्या ३४ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर जेट एअरवेजच्या ६ आंतरराष्ट्रीय आणि ६४ आंतरदेशीय विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून, ६० पेक्षा अधिक विमानांच्या वेळा बदलल्या आहेत. सोमवारी एकूण २२५ उड्डाणे रद्द करण्यात आली. मंगळवारीही मुंबई विमानतळावरील उड्डाणे सायंकाळी ५ वाजल्यानंतर पूर्ववत होतील, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली.

टॅग्स :विमानतळ