धावपट्टीच्या दुरुस्तीमुळे विमान वाहतूक मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:49 AM2019-02-08T06:49:48+5:302019-02-08T06:50:10+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरू झाले असून त्याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्ट्यांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरू झाले असून त्याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे. सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत ६ तास धावपट्टी बंद असल्यामुळे या कालावधीत एकाही विमानाचे मुंबईतून उड्डाण होऊ शकले नाही.
दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्च या कालावधीत मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे ५ हजार विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होणार आहे.
मुंबईतून दररोज २४ तासांत सरासरी ९५० विमानांची ये-जा होते. दुरुस्तीचा फटका दररोज २३० विमानांना बसणार आहे. या कालावधीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानांचा मार्ग बदलण्यात येणार आहे, तर काही विमानांचा वेळ बदलण्यात येणार आहे. रद्द केल्या जाणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्यात येईल व ज्यांना शक्य असेल त्यांना दुसºया विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
विमानाच्या तिकीट दरात वाढ
मुंबईतून दिल्ली, गोवा व बंगळुरू या ठिकाणी जाणाºया विमानांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी जाणाºया प्रवाशांना जास्त फटका बसत आहे. या मार्गावरील विमान तिकिटांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. अनेक प्रवाशांना सकाळी ११ पूर्वी अथवा सायंकाळी ५ नंतर प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांचे कामाचे वेळापत्रकदेखील बदलले आहे.