Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांनाही कोरोनाची लागण, नेतेमंडळींच्या रुग्णसंख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:34 PM2022-01-05T18:34:09+5:302022-01-05T18:38:33+5:30
राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. कामानिमित्त त्यांना फिरावच लागतं. लोकांना भेटावच लागतं.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत असून आमदार, खासदारांपासून ते अनेक मंत्रीमहोदयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरीही चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यानंतर, आता राष्ट्रवादीकाँग्रेसच्या महिला नेता आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. ''सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन'', असे चाकणकर यांनी म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांना कोरोना झाल्याने नेतेमंडळींच्या कोरोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली आहे.
सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 5, 2022
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोना बाधित राजकीय व्यक्तींचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत १३ मंत्री आणि ७० हून अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच याबाबतची माहिती काल दिली होती. राजकीय व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी दररोज कामानिमित्त अनेकांच्या संपर्कात येत असतात. कामानिमित्त त्यांना फिरावच लागतं. लोकांना भेटावच लागतं. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, केसी पाडवी यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, पंकजा मुंडे, सुजय विखे पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वरुण देसाई, प्रवीण दरेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.