Join us  

Rupali Patil Thombare: अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल: प्रवेश करताच मनसेला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:35 PM

मनसेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

मुंबई – मनसेच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विविध पक्षाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मी मनसेचा राजीनामा देत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते तसेच यापुढे मी काम करणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल असा दावा त्यांनी केला.

प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करुन प्रवेशाचे संकेत दिले होते. "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार...", असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं होते.

कोण आहेत रुपाली पाटील ठोंबरे?

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.

टॅग्स :मनसेराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार