५००० विद्यार्थ्यांच्या रूपारेल कॉलेजला लायब्ररीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:01 AM2018-10-28T05:01:59+5:302018-10-28T05:02:48+5:30
मुंबईतील नामांकित महाविद्यालय रूपारेलमध्ये ५००० हजार इतकी विद्यार्थीसंख्या असूनही लायब्ररीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि नियमानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज लायब्ररी असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईतील नामांकित महाविद्यालय रूपारेलमध्ये ५००० हजार इतकी विद्यार्थीसंख्या असूनही लायब्ररीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लायब्ररीची सुविधा नसूनही विद्यार्थ्यांकडून दरवर्षी त्याचे शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे करूनही त्यावर काहीच होत नसल्याने, आता अखेर मनविसेने यात उडी घेतली आहे. पुढील एक महिन्याच्या आत प्रशासनाने विद्यार्थ्यांना लायब्ररीची सुविधा न दिल्यास, आंदोलनाचा इशारा मनविसेने दिला आहे.
प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज लायब्ररी असणे यूजीसीच्या नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, रूपारेल महाविद्यालयाचे प्रशासन मात्र याचे पालन करताना दिसत नाही. याउलट लायब्ररी नसली, तरी ३०० विद्यार्थ्यांना पुरेल एवढी वाचन खोली असल्याची सारवासारव महाविद्यालय प्रशासन करत असल्याचा दावा मनविसेने केला आहे. महाविद्यालयात ५००० विद्यार्थी शिक्षण घेत असून, बाकीच्या विद्यार्थ्यांची लायब्ररीअभावी गैरसोय होत असल्याचे मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी दिली, तसेच सुविधा देत नसूनही लायब्ररीचे शुल्क मात्र विद्यार्थ्यांकडून आकारले जाणे, म्हणजे विद्यार्थ्यांवरच अन्याय असल्याची टीका त्यांनी केली.
या संदर्भात रूपारेल महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालयाची सोय उपलब्ध व्हावी. परीक्षा काळात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने, मनविसेने अध्यक्ष अदित्य शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली रूपारेलचे प्राचार्य तुषार देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. रूपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार देसाई यांच्याशीही संपर्क केला असता, विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची सोय आहे. आवश्यक त्या काळात वर्गखोल्यांचीही सोय केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.