दहा हजार मायक्रो-ग्रिडसने ग्रामीण घरे व उद्योगांना वीज मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:56 AM2020-03-09T00:56:00+5:302020-03-09T00:56:08+5:30
ईव्ही चार्जिंग व्यवसायामार्फत अत्याधुनिक ऊर्जा सुविधा पुरविण्याची योजना कंपनीने आखली आहे़ ८ शहरांमध्ये १०० ईव्ही चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत.
मुंबई : सोलर रुफटॉप सर्व्हिसेस, ईव्ही चार्जिंग स्टेशन्स इत्यादी नवीन ग्राहक केंद्री व्यवसायांची माहिती टाटा पॉवरच्या अभियानातून देण्यात येत आहे़ टाटा पॉवर २०२६ सालापर्यंत १० हजार मायक्रो-ग्रिड्स उभारणार आहे. यासाठी रॉकफेलर फाउंडेशनसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या माध्यमातून लाखो ग्रामीण घरे व उद्योगांना वीज देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा दावा कंपनीने केला आहे.
निवासी ग्राहकांसाठी रुफटॉप सोलर प्रकल्पांचा समावेश असलेल्या टाटा पॉवरच्या नवीन ग्राहक केंद्री व्यवसायाचा भारतातील ६६ शहरांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. आजवर एकूण ३१५ मेगावॅटपेक्षा जास्त रुफटॉप प्रकल्प उभारले असून, त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा समावेश आहे. त्याचबरोबरीने देशातील १३ राज्यांमध्ये युटिलिटी स्केल प्रोजेक्ट्स उभारले आहेत; ज्यांची एकूण क्षमता सुमारे २.७६ गिगावॅट्स आहे.
ईव्ही चार्जिंग व्यवसायामार्फत अत्याधुनिक ऊर्जा सुविधा पुरविण्याची योजना कंपनीने आखली आहे़ ८ शहरांमध्ये १०० ईव्ही चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत. सध्या ८५ चार्जिंग स्टेशन्स असून, त्यामध्ये सार्वजनिक, सेमी-पब्लिक आणि कॅप्टिव्ह ठिकाणांचा समावेश आहे.
नेक्सन ईव्ही या कंपनीसोबत टाटा पॉवरने नुकतीच भागीदारी केली असून भविष्यासाठी सज्ज असतील, असे स्मार्ट ग्राहक तयार करण्याचा ट्रेंड पुढेदेखील कायम राखला जाईल.