मुंबई - युवासेना प्रमुख आणि ठाकरे कुटुंबाचे राजकीय वारसदार आदित्य ठाकरेंनीउस्मानाबाद मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यात शिवसेना रुजवली, येथील मातीत बाळासाहेंच्या विचारांची बीजे तेवत आहेत. म्हणूनच, मराठवाड्यातील विकासासाठी आदित्य ठाकरेंनीउस्मानाबाद जिल्ह्यातून उमेदवारी स्विकारावी, अशी विनंती बोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना निवडणुकांच्या रिंगणात उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. वरळी मतदारसंघातू आदित्य ठाकरे विधानसभेच्या रणांगणात उतरतील, अशी चर्चा आहे. मात्र, जनआशीर्वाद यात्रेतून मराठवाडा,प. महाराष्ट्र आणि विदर्भ पिंजून काढला आहे. त्यावेळी, महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे, असे वक्तव्यही आदित्य यांनी केले आहे. आदित्य यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आदित्य यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब किंवा भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह येथील शिवसेना नेत्यांनी केला आहे.
ग्रामीण भागात शिवसेनेची मूळं मजबूत होण्यासाठी, आदित्य यांनी ग्रामीण भागातूनच निवडणूक लढविण्याचा सल्लाही शिवसेना पक्षप्रमुखांना काहींना दिल्याचं समजतयं. मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी, उद्योगधंदे, औद्योगिक आणि हरितक्रांती करायची आहे. त्यासाठी, आदित्य यांना उस्मानाबादमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे, असा आग्रह शिवसेना नेत्यांकडून होत आहे.