गोराईत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:10 AM2018-12-07T04:10:14+5:302018-12-07T04:10:21+5:30

बोरीवली पश्चिमेकडील गोराई क्रमांक २ येथील रहिवाशांना गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Rural water shortage; Ignore People Representatives | गोराईत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

गोराईत पाणीटंचाई; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Next

मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील गोराई क्रमांक २ येथील रहिवाशांना गेल्या एक महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गोराई खाडीजवळील सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, ३० सोसायट्यांमध्ये पाण्याची समस्या आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी पाणीकपात केली जात असून, नेमकी ही कपात किती? याबाबत प्रशासन ठोस माहिती देत नाही. गोराई क्रमांक २ येथील खाडीपट्ट्यातील सोसायटीमध्ये रहिवाशांना पाण्याची दोन कनेक्शन्स आहेत. त्यातील एक कनेक्शन घरामध्ये असून, दुसरे घराबाहेर आहे. पाण्याचा दाब व्यवस्थित असेल तर रहिवासी घरामधून पाणी भरतात. मात्र, काही दिवसांपासून पाण्याचा दाब कमी असल्यामुळे रहिवाशांना घराबाहेर पाणी भरावे लागत आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी शारदा चव्हाण यांनी दिली. आर/मध्य विभागाच्या जल खात्याचे साहाय्यक अभियंता अशोक घाडगे यांनी सांगितले की, गोराई म्हाडाचा जो शेवटचा पॉकेट आहे त्या भागात १५ टक्के पाणीकपात सुरू आहे. पूर्वीपासून त्या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून आता १५ टक्के पाणीकपात केल्याने पाण्याची समस्या वाढली आहे. यासंबंधी नुकतीच संबंधित विभागाकडे बैठक घेण्यात आली आहे. गोराई भागातून बऱ्याच पाण्याच्या समस्या येतात. त्यामुळे वरच्या स्तरावर जाऊन १५ मिनिटे पाण्याची वेळ वाढवून द्या, नाहीतर वॉटर बुस्ट तरी द्या. या दोन गोष्टींची मागणी करणार आहे.
ज्या वेळी गोराई येथे लोकवस्ती वसली तेव्हा जलवाहिनी टाकण्यात आली. तेव्हापासून यात काही बदल करण्यात आला नाही. गेल्या १० वर्षांपासून काँगे्रस पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कामे त्वरित केली जात नाहीत. युवासेनेच्या माध्यमातून पाण्याच्या समस्येवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, यावर निर्णय झालेला नाही.
- विशाल पडवळ, समन्वयक, युवासेना, बोरीवली विधानसभा
पाणी कमी दाबाने येत असल्याने घरातील कामे अर्धवट राहत आहेत. कपडे एक दिवसाआड धुवावे लागत आहेत. सोसायटीमध्ये दोन तास पाणी येते. यात एक तासात १५ घरे पाणी भरतात. मात्र, एका तासामध्ये १५ घरांना पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या बाहेर रांगा लावून पाणी भरण्याची वेळ आली आहे.
- रंजना पाताडे, स्थानिक

Web Title: Rural water shortage; Ignore People Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.