Join us

ग्रामीण महिलांची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

By admin | Published: April 03, 2015 10:51 PM

तालुक्यातील चिखले गावात महिलांनी एकत्र येऊन स्वयंरोजगार सुरू केला असून ज्वेलरी व कागदी पिशव्या बनवण्याच्या लघुउद्योगाचे उद्घाटन नुकतेच झाले.

वाडा : तालुक्यातील चिखले गावात महिलांनी एकत्र येऊन स्वयंरोजगार सुरू केला असून ज्वेलरी व कागदी पिशव्या बनवण्याच्या लघुउद्योगाचे उद्घाटन नुकतेच झाले. जय लक्ष्मी एज्युकेशन सोसायटी आणि हँण्डीक्राफ्ट सोर्सींग बंगलोर यांच्या माध्यमातून चिखले येथील महिलांना हस्तकला कौशल्य प्रशिक्षण दिले जात असून येथील महिलांनी मोठ्या प्रमाणावर कागदी पिशव्या आणि ज्वेलरी तयार केल्या आहेत. हा माल प्राथमिक स्तरावर गोरेगाव येथे होणाऱ्या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून त्यानंतर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व प्रशिक्षक कल्पना हेबळेकर यांनी दिली.वाडा तालुक्यातील बहुसंख्य कारखाने बंद होत असून त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या महिलांचे हात बेरोजगार झाले असताना लघुउद्योग म्हणून घरबसल्या अशा प्रकारचे व्यवसाय निर्माण झाल्यास येथील महिला स्वावलंबी बनतील यासाठी आम्ही महिलांनी या लघुउद्योगाला सुरूवात केली असल्याची प्रतिक्रीया येथील महिला गटप्रमुख वेदांती पाटील यांनी दिली. गावातील ३६ महिलांनी या लघुउद्योगासाठी पुढाकार घेतला आहे. संस्थेकडून कच्चा माल पुरवला जाणार असून महिलांनी बनवलेल्या पक्क्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल यातून महिलांना किमान तीन हजार मासिक उत्पन्न घरबसल्या मिळणार आहे. स्वयंरोजगाराची अशा प्रकारची संधी निर्माण झाल्याने येथील महिला स्वयंअर्थसहाय्यतेकडे निश्चितच वाटचाल करतील असा विश्वास येथील महिला प्रांजल विशे यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)