चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला गर्दी; बोरीवली ते चिंचपोकळीपर्यंत घातले भक्ताने साष्टांग नमस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:00 AM2019-09-09T01:00:47+5:302019-09-09T01:00:58+5:30
बोरीवलीमधील गोराई येथे राहणारा लतेश पाटणकर या गणेशभक्ताने नुकतेच चिंतामणीचे दर्शन साष्टांग नमस्कार घालून केले.
मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा शतकोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने यंदा ‘चिंतामणी’च्या दरबारात नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा भव्यदिव्य देखावा साकारण्यात आला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचे विलोभनीय रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भक्तगण दिवसेंदिवस गर्दी करत आहेत. या मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील जलाभिषेकही भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
कला दिग्दर्शक नितीशकुमार यांच्या संकल्पनेतून नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. भारत आणि नेपाळ या दोन देशांना सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या हे मंदिर जोडून ठेवते. या ६० फुटी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक आरास विशाल भुजबळ यांनी केली आहे. वेशभूषा प्रकाश लहाने यांनी केली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर ७५ फूट उंचीचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. या वर्षी चिंतामणी गणेशमूर्तीची संकल्पना दिवंगत मूर्तिकार विजय खातू यांची होती. यंदाची ही मूर्ती खातू यांची कन्या रेश्मा हिने साकारली आहे.
बोरीवली ते चिंचपोकळीपर्यंत घातले साष्टांग नमस्कार
बोरीवलीमधील गोराई येथे राहणारा लतेश पाटणकर या गणेशभक्ताने नुकतेच चिंतामणीचे दर्शन साष्टांग नमस्कार घालून केले. बोरीवली येथील वझीरा नाक्याजवळील गणेश मंदिरापासून ते चिंचपोकळीचा चिंतामणीपर्यंत म्हणजेच सुमारे ३० किलोमीटरचा पल्ला त्याने साष्टांग नमस्कार घालत गाठला. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी ११ वाजता त्याने साष्टांग नमस्कार घालायला सुरुवात केली; गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी ४ वाजता तो चिंतामणीच्या मंडपात पोहोचला. या अनोख्या पद्धतीने बाप्पाचे दर्शन घेतल्याने लतेशवर सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होतोय. यंदाचे चौथे वर्ष असून तो फक्त चिंतामणी बाप्पाच्या श्रद्धेपोटी करतो.
लतेश पाटणकर यासंदर्भात सांगतो की, वझीरा मंदिरापासून सुरुवात करून २१ पावले चालत जाऊन मग साष्टांग नमस्कार घालत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत गेलो. त्यानंतर चार पावले पुढे जात एक साष्टांग नमस्कार घालून चिंतामणीच्या मंडळापर्यंत पोहोचलो. दरवर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जातो. तेव्हा तिथे एक तरुण साष्टांग नमस्कार घालत रायगडावर येतो. तर त्याच्याकडून ही प्रेरणा घेतली. साष्टांग नमस्कार घालत असताना माझे मित्र सोबत असतात, त्यांची वेळोवेळी मदत मिळते.
दर्शन घेईपर्यंत पाण्याशिवाय दुसरे काहीही खात नाही. बाप्पाने मला कधीही कोणत्या गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत. माझी बाप्पावर
खूप श्रद्धा असून मी गेल्या तीन वर्षांपासून अशाप्रकारे बाप्पाचे दर्शन घेत आहे.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘चिंतामणी’चे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे, स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी उपस्थिती दर्शविली.
चार आणे वर्गणीवर सुरू केला उत्सव
१ ऑगस्ट १९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ६ सप्टेंबर १९२० रोजी चिंचपोकळी परिसरातील काही तरुण एकत्र आले. त्यानंतर या तरुणांनी मिळून चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. अवघ्या १० दिवसांत पहिल्या गणेशोत्सवाची तयारी मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आणि १६ सप्टेंबर १९२० रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापना केली. लक्ष्मी नारायण व्यायामशाळा ते काळाचौकी रोड आणि शिवडी ते भारतमाता सिनेमा हे मंडळाचे प्रारंभीचे कार्यक्षेत्र होते. केवळ चार आणे वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला.