आचारसंहिता कधीही लागेल म्हणून रेल्वे प्रशासनाची उद्घाटनासाठी लगबग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:46 AM2019-09-12T01:46:23+5:302019-09-12T01:46:37+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली दोनदा धावणारी राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चार वेळा धावणार आहे. शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी कंबर कसली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली दोनदा धावणारी राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चार वेळा धावणार आहे. शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. प्रवाशांच्या कायदेविषयक समस्या सोडविण्यासाठी दुसरे न्यायालय उभे करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या प्रवासी सुविधांत वाढ होणार आहे. खार रोड, विलेपार्ले येथे पादचारी पूल आणि लोअर परळ येथील सरकत्या जिन्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावरील चेंबूर आणि डॉकयार्ड रोड ग्रीन स्थानक, २२ रेल्वे स्थानकांवर एलईडी इंडिकेटर, १३ स्थानकांचे छत आणि फलाटांची दुरुस्ती, सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक १४ ते १८ नवीन प्रवासी कॉरिडोर, परळ स्थानकातील सरकते जिने आणि लिफ्ट, गोवंडी, घाटकोपर स्थानकात नवीन तिकीटघर तसेच सीएसएमटी, भायखळा स्थानकात ३ मोठ्या पंख्याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
शिवाय लोअर परळ, प्रभादेवी, महालक्ष्मी, माटुंगा रोड, माहिम, सांताक्रुझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, राम मंदिर, शहाड, दिवा, आंबिवली, टिटवाळा, भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर, ठाकुर्ली, कॉटनग्रीन, गोवंडी, मानखुर्द, शिवडी, जीटीबी, डॉकयार्ड रोड, सॅण्डहर्स्ट रोड, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, मशीद, टिळकनगर, कामन रोड या स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर आठवड्याचे सातही दिवस ‘गारेगार’ प्रवास
- पश्चिम रेल्वेत आता दुसरी एसी लोकल दाखल झाली आहे. त्यामुळे आठवड्यातील सातही दिवस एसी लोकल धावणार आहे. आतापर्यंत शनिवार तसेच रविवारी न धावणारी एसी लोकल आता हे दोन्ही दिवसदेखील धावणार आहे. यासह एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत.
- पश्चिम रेल्वे मार्गावरून पहिल्यांदाच शनिवार, १४ सप्टेंबर आणि रविवार, १५ सप्टेंबर रोजी एसी लोकल धावणार आहे. तसेच यापुढे प्रत्येक वीकेण्डला एसी लोकलचा प्रवास प्रवाशांना करता येईल.
- पश्चिम रेल्वे मार्गावरून पहिली एसी लोकल २५ डिसेंबर २०१७ रोजी धावली. गारेगार प्रवासामुळे एसी लोकलला पसंती वाढली. त्यामुळे २०१८-१९ या काळात एसी लोकलमधून १९ कोटी रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला. तर, आॅगस्ट २०१९ पर्यंत २३ लाख प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला असून त्यातून ९ कोटी ६१ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.
- प्रवाशांचा एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद वाढल्याने मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा या स्थानकांतही एसी लोकलला थांबा देण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांची संख्या आणि महसूल वाढल्याची प्रतिक्रिया पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नियमित वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार
चर्चगेट ते विरारदरम्यान सातही दिवस एसी लोकल नियमित वेळापत्रकानुसारच चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती . पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून आता त्यांना शनिवार आणि रविवारीही एसी लोकलमधून प्रवास करता येईल, असेही भाकर यांनी सांगितले.