लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातील पहिले सार्वजनिक विमानतळ अशी ख्याती असलेल्या जुहू विमानतळावर गेल्या काही महिन्यात विमानांची वर्दळ वाढली आहे. जानेवारी महिन्यात २ हजार ३०३, तर फेब्रुवारी महिन्यात जवळपास २ हजार ४२४ विमानांनी या विमानतळावरून ये-जा केली.
धावपट्टी लहान असल्याने जुहू विमानतळावरून प्रामुख्याने लहान विमानांचे उड्डाण होते. त्यात चार्टर्ड विमाने, सरकारी आणि खासगी हेलिकाॅफ्टर्स यांचा समावेश आहे. विमान चालकाचे प्रशिक्षण देण्यासाठीही या विमानतळाचा वापर केला जातो. त्यामुळे येथे अन्य विमानतळांच्या तुलनेत विमानांची फारशी वर्दळ नसते. परंतु, कोरोनाकाळात या विमानतळावर विमानांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोना प्रारंभीच्या काळात संसर्गप्रसार हा विमान प्रवास किंवा विमानतळावर प्रवाशांच्या संपर्कात आल्याने होत असल्याचे दिसून आल्याने अनेक प्रवाशांनी सुरक्षात्मक दृष्टिकोनातून प्रवासासाठी चार्टर्ड विमानांचा पर्याय निवडला. त्याचप्रमाणे केमोथेरपीसाठी येणाऱ्या बऱ्याच रुग्णांनी कोरोनाकाळात चार्टर्ड विमानांचा आधार घेतला. कारण अशा रुग्णांना संसर्गाचा धोका अधिक असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज असते. कोरोनाकाळात चार्टर्ड विमानाने प्रवास करणाऱ्यांत गर्भवती महिलांची संख्याही लक्षणीय असल्याचे, मॅब एव्हिएशनचे प्रतिनिधी मंदार भारदे यांनी सांगितले.
मार्च महिन्यात जुहू विमानतळावरून भरारी घेतलेल्या आणि येथे उतरलेल्या विमानांची संख्याही मोठी आहे. १ मार्च रोजी ७०, २ मार्च १०७, ३ मार्च ८४ आणि ४ मार्च रोजी ७६ विमानांनी या विमानतळावरून ये-जा केली.
...त्यामुळेच वाढली वर्दळ
कोराेनाकाळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रवाशांनी चार्टर्ड विमानांनी प्रवास केला. त्यात केमोथेरपीसाठी येणारे रुग्ण, गर्भवती महिला आणि इतर व्याधिग्रस्त रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे कोरोनाकाळात जुहू विमानतळावर विमानांची वर्दळ वाढल्याचे दिसून येते.
- मंदार भारदे, मॅब एव्हिएशन
------------------------